देवगड / प्रतिनिधी
देवगड–नांदगाव महामार्गावरील हडपीड येथील कुलस्वामिनी मंदिराजवळील अवघड वळणावर बुधवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार विनायक धोंडू पुजारे (वय २२, रा. कोटकामते आडिवरेवाडी) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहप्रवासी निखिल नारायण नवलू (वय २४) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर गोवा–बांबुळी येथे उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळोशी वरचीवाडी येथील रिक्षाचालक बाळकृष्ण नागोजी खरात हे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०७ एएच २५३७) घेऊन देवगडहून कोळोशीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी विनायक पुजारे हा सहप्रवासी निखिल नवलू याच्यासह दुचाकीवरून नांदगावकडून कोटकामतेकडे येत होता. हडपीड येथील अवघड वळणावर भरधाव वेगामुळे विनायक पुजारे याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध बाजूस जाऊन समोरून येणाऱ्या रिक्षावर आदळली.
धडक इतकी जबरदस्त होती की विनायक पुजारे याचा जागीच मृत्यू झाला. तर मागील सीटवर असलेला निखिल नवलू गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तात्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. रिक्षाचालक बाळकृष्ण खरात यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनास्थळी देवगड पोलीस हवालदार गणपती गावडे आणि योगेश महाले यांनी मध्यरात्री भेट देऊन पंचनामा केला. गुरुवारी सकाळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात विनायक पुजारे यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी रिक्षाचालक बाळकृष्ण खरात यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत.
