देवगड (प्रतिनिधी)
आंबा बागायतदारांच्या विमा नुकसानभरपाई प्रश्नावर लवकरच बैठक पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन
आंबा बागायतदारांच्या विमा नुकसानभरपाई संदर्भातील प्रश्न निकाली काढण्यासाठी लवकरच विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक आपल्या अध्यक्षतेखाली घेतली जाईल, असे आश्वासन सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांनी आज देवगड येथे झालेल्या बैठकीत दिले.
या बैठकीत माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईक नवरे,तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, भाजप नेते बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, बंड्या नारकर, तहसीलदार रमेश पवार, फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास रूमडे व संघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत येणाऱ्या अडचणी, वेदरिंग स्टेशनवरून तयार होणाऱ्या अहवालातील त्रुटी, तसेच विमा हप्त्याच्या तुलनेत अपुरी भरपाई मिळत असल्याबद्दल तक्रारी मांडल्या. काही वेदरिंग स्टेशन बंद अवस्थेत असून त्यातून चुकीचे अहवाल दिले जातात, त्यामुळे नुकसानभरपाईची अचूकता राहत नाही, असे माजी आमदार अजित गोगटे यांनी निदर्शनास आणून दिले.
यावर पालकमंत्री राणे यांनी या मुद्यावर लवकरच बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश जिल्हा कृषी अधीक्षक आरती पाटील यांना दिले. याशिवाय, पिक विमा मिळण्याचा कालावधी १५ मे ऐवजी ३० मे करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली.शेतकऱ्यांच्या वतीने शेती फळ बागायती संघटनेचे अध्यक्ष विलास रुमडे यांनी संबंधित अनेक प्रश्न यावेळी मांडले.


