देवगड / प्रतिनिधी
बीच एन्जॉय करण्याच्या नादात , शॉर्टकट आला अंगलट , गाडी रुतली वाळूत पर्यटकांच्या आनंदाचा झाला हिरमोड
मुख्य रस्त्यावरून समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी चक्क वाळूतून मार्ग काढणाऱ्या अहमदनगरं मधील हौशी पर्यटकांची गाडी वाळूत रूतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नाअंती ही गाडी बाहेर काढण्यात आली. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी ४ वा. च्या सुमारास कुणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर घडला.
देवगड तालुक्यात पर्यटन हंगाम बहरला असून मे महिन्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक देवगड तालुक्यातील पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत. मात्र, येथील भौगोलिक परिस्थितीची माहिती नसल्याने ‘शॉर्टकट’ घेणाऱ्या हौशी पर्यटकांना मौजमज्जा त्यांच्या अंगलट येत आहे. शुक्रवारी सायंकाळी असाच एक प्रकार कुणकेश्वर समुद्र किनारी घडला. कुटुंबासोबत कुणकेश्वर येथे आलेल्या एका पर्यटकाने कुणकेश्वर समुद्र किनारी जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरून आपली गाडी चक्क वाळूत नेऊन तेथून किनाऱ्यापर्यंत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची गाडी वाळूतच रूतल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांना समजताच काही ग्रामस्थ त्या पर्यटक फॅमिलीच्या मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र, वाळूत रूतलेली गाडी बाहेर काढणे कठीण बनले होते. अखेर, तब्बल दीड तासानंतर जेसीबीच्या सहाय्याने ही गाडी वाळूतून बाहेर काढण्यात आली. बीच एन्जॉय करण्याच्या नादात वाळूत अडकलेल्या गाडीमुळे त्या पर्यटकांच्या उत्साहाचा हिरमोड झाला.
