देवगड (स्वप्नील लोके)
प्रतीक्षा संपली ! सुमारे ३०० वर्षांनी जुळून आला राजयोग ; श्री देव रामेश्वर आणि श्री देव कुणकेश्वर यांचा ऐतिहासिक मिलन सोहळा
मिठबाव, तांबळडेग आणि कातवण गावांच्या ग्रामदैवत असलेल्या श्री देव रामेश्वराचा सुमारे तीनशे वर्षांनंतर श्री क्षेत्र कुणकेश्वर शंभू महादेवाच्या भेटीचा योग जुळून आला आहे. ही ऐतिहासिक घटना सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखी आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वरला रामेश्वराचे आगमन हा भक्तांसाठी एक अनमोल क्षण ठरणार आहे.
गेल्या ३८ वर्षांनंतर इनामदार श्रीदेव रामेश्वर कुणकेश्वरच्या भेटीसाठी जात आहेत.त्याच बरोबर मिठबाव श्री देव रामेश्वराच्या भेटीचा अनेक संघर्ष व अडथळे पार करत अखेर या भेटीचा राजयोग यावर्षी जुळून आला आहे. ही भेट म्हणजे केवळ एक यात्रा नाही, तर सुमारे तीनशे वर्षांच्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणारा दिव्य सोहळा आहे. या महत्त्वपूर्ण घटनेमुळे मिठबाव, तांबळडेग आणि कातवण या तीन गावांमधील संपूर्ण गावकरी समाज मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने या सोहळ्याच्या साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाला आहे.
रामेश्वर आणि कुणकेश्वर हे दोन बंधू असल्याची श्रद्धा आहे. या दोन देवतांचे पुनर्मिलन पाहण्यासाठी सर्व बारा पाच मानकरी, देवसेवक आणि गावरयत भक्तिभावाने तयारी करत आहेत. या ऐतिहासिक प्रसंगाची संपूर्ण गावभक्तांना आतुरता लागली आहे. या भेटीच्या निमित्ताने गावभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून प्रत्येक भक्ताच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसून येत आहेत.
या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आला आहे. गावकरी आणि भक्तगण आपली कामे भक्तीभावाने पार पाडत आहेत. पवित्र मंत्रोच्चार,वाद्यांचा गजर, गजराचे सुरेल नाद यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत आहे. हा सोहळा फक्त दोन देवतांचा मिलन सोहळा नसून, तो श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा महान उत्सव आहे.

