कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेस आज पासून प्रारंभ ; कुणकेश्वर भेटीसाठी दहा देवस्वाऱ्या येणार

 

देवगड :प्रतिनिधी

कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेस आज पासून प्रारंभ ; कुणकेश्वर भेटीसाठी दहा देवस्वाऱ्या येणार

सुमारे तीनशे वर्षांनी मिठबावचा श्री देव रामेश्वर येणार कुणकेश्वर भेटीला

दक्षिण कोकणची काशी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रौत्सवाला आजपासून सुरूवात होत आहे. २६ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ही यात्रा होत असून गुरूवार दि. २७ फेब्रुवारी रोजी दर्श अमावास्या महापर्वणी तिर्थस्नानाचा योग आहे.त्याचबरोबर प्रयागराज येथे सुरू असलेल्या महा कुंभमेळ्याची सांगता देखील यादिवशी
असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांचा ओघ वाढणार आहे. कुणकेश्वर भेटीला यावर्षी दहा देवस्वाऱ्या येणार असून सुमारे ३०० वर्षांनी मिठबावचा रामेश्वर तर ३९ वर्षांनी आचरा येथील श्री देव रामेश्वर देखील कुणकेश्वर भेटीसाठी येणार आहे.यात्रेचा कालावधी दोन दिवसाचा असल्याने यावर्षी भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होणार आहे. कुणकेश्वर यात्रोत्सवाची तयारी पुर्णत्वास गेली असून शिवभक्तांची पाऊले कुणकेश्वर क्षेत्री वळू लागली आहेत.

कुणकेश्वर यात्रोत्सवाला आजपासुन प्रारंभ होत आहे.यात्रोत्सवाची तयारी पुर्णत्वास गेली असून देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीकडून नीटनेटके नियोजन करण्यात आले आहे. एसटी, वीजवितरण, पोलिस, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, दुरसंचार आदी सर्व विभागांकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे.यात्रेच्या पाश्र्वभुमीवर व्यापाऱ्यांनी विविध खेळण्यांचे स्टॉल देखील याठिकाणी उभारले आहेत.

रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची मिठाई, हॉटेल्स,मालवणी खाजा,कापड दुकानेयांनी यात्रा परिसर फुलुन गेला आहे.या वेळी यात्रेच्या ठिकाणी पारंपारिक शेतीअवजारे मोठ्या विक्रीस आली आहेत.तसेच कुणकेश्वरच्या समुद्रकिनारही भेल,आईस्क्रिम,इतर हॉटेल्स यामुळे समुद्रकिनारी दुकानाने भरून गेलेला दिसून येत आहे.

दरवर्षीप्रमाणे वाहतुकीचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तारामुंबरी मिठमुंबरी पुलामुळे देवगडकडील बहुतांशी वाहतुक ही पुलावरून होणार असल्याने वाहतुक कोंडी कमी प्रमाणात होईल.तीन ठिकाणी पार्कींग व्यवस्था करण्यात आली आहे.यामध्ये तारामुंबरी मिठमुंबरी पुल मार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी आस्मी हॉटेलनजिक, कणकवली येथून लिंगडाळमार्गे येणाऱ्या वाहनांसाठी हॉटेल शिवसागरसमोर, आचरा मिठबांव मार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी एमटीडीसीसमोर वाळूवर पार्कीग व्यवस्था ठेवण्यात आली आहे.यात्रेतील अनुचित प्रकारावर नजर ठेवण्यासाठी पोलीसांचे टेहळणी पथक व देवस्थान ट्रस्टच्या स्वयंसेवकांचे पथक कार्यरत आहे.त्याचप्रमाणे क्लोज सर्किट कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.

कुणकेश्वर भेटीसाठी जाणार १० देवस्वारी

महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर भेटीसाठी १० देवस्वाऱ्या जाणार आहेत.यामध्ये मिठबांव श्रीदेव रामेश्वर देवस्वारी ३०० वर्षांनी कुणकेश्वर भेटीसाठी जाणार आहे तर श्री इनामदार रामेश्वर संस्थान आचरा श्री देव रामेश्वराची देवस्वारी ३९ वर्षांनी, शिरगाव श्री देवी पावणाई देवी २२ वर्षांनी व देवगड जामसंडे गावचे ग्रामदैवत श्री दिर्बा रामेश्वर देवस्वारी १२ वर्षांनी कुणकेश्वर भेटीसाठी जाणार आहेत. याशिवाय श्री देव माधवगिरी माईन कणकवली, श्री गांगेश्वर नारींग्रे, श्री देव जैनलिंग रवळनाथ महालक्ष्मी पावणादेवी गांगो बिडवाडी कणकवली, श्री देव गांगेश्वर बावशी बेळणे कणकवली, श्री पावणादेवी हुंबरठ कणकवली, श्री गांगेश्वर पावणाई भावई दाभोळे या देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीला जाणार आहेत.यावर्षीचा १० विक्रमी देवस्वाऱ्या कुणकेश्वरमध्ये जात असल्याने तसेच यात्रा कालावधी दोन दिवसांचा असल्याने गर्दीचा उच्चांक गाठणार आहे.

चोख पोलिस बंदोबस्त

कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण २६ अधिकारी, १०३ अंमलदार, १४९ होमगार्ड असा २७८ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

२६ एसटी गाड्यांचे नियोजन

देवगड आगारातून २६ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती आगारव्यवस्थापक निलेश लाड यांनी दिली.यामध्ये देवगडमधून ११, शिरगावहून ६, नांदगांव २, पोयरे १, नारींग्रे दहिबांव १, किंजवडे डोबवाडी १, मोंडतर टेंबवली १, आरे निरोम १, तळेबाजार तळवडे बागतळवडे १, तेलीवाडी ताम्हाणेतर १ अशा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *