विज्ञान युगातही श्रद्धेची परंपरा; नवीन वर्षाच्या स्वागताऐवजी ‘शिराळा’ गाव पूर्णपणे होणार रिकामे !

वैभववाडी (तुषार शिंगाडे)

 

आज जगभरात ३१ डिसेंबरचा उत्साह असून
नागरिक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारे आणि शहरांमध्ये गर्दी करत आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील शिराळा या गावात चित्र काही वेगळेच आहे. जिथे जग ‘पार्टी’च्या मूडमध्ये आहे, तिथे शिराळा गावचे ग्रामस्थ आपल्या परंपरा जपत आजपासून ‘गावपळण’ करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

देवस्थानचा कौल आणि परंपरेची सुरुवात

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही अनेक गावांमध्ये गावपळणीची परंपरा जपली जाते. शिराळा गावचे जागृत देवस्थान श्री गांगेश्वर यांनी सोमवारी ‘हुकूम’ (कौल) दिल्यानंतर या गावपळणीला अधिकृत सुरुवात झाली आहे. या परंपरेनुसार, बुधवारी दुपारनंतर संपूर्ण गाव निर्मनुष्य होणार असून ग्रामस्थ वेशीबाहेर स्थलांतर करणार आहेत.

कशी असते ही गावपळण?

स्थलांतरः ग्रामस्थ केवळ स्वतःच जात नाहीत, तर सोबत आपली पाळीव जनावरे, पशुपक्षी आणि आवश्यक अन्नधान्याचा साठा घेऊन गाव सोडतात.
तात्पुरता संसारः लगतच्या सडुरे गावाच्या हद्दीत, धोंडोबा डोंगराच्या पायथ्याशी उघड्या माळराणावर ग्रामस्थांनी मंगळवारपासूनच झोपड्या बांधण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही दिवस हाच त्यांचा संसार असेल.

कालावधीः ही गावपळण साधारणपणे ५, ७ किंवा ९ दिवसांची असते. जोपर्यंत श्री गांगेश्वर पुन्हा गावात परतण्याचा आदेश देत नाहीत, तोपर्यंत एकही ग्रामस्थ गावात पाऊल ठेवत नाही.
थंडीच्या कडाक्यात निसर्गाच्या सानिध्यात वास्तव्य

कोकणात सध्या पौष महिना सुरू असून थंडीचा कडाका वाढला आहे. अशा कठीण परिस्थितीतही शिराळावासीय आपल्या श्रद्धेपोटी घरादाराचा त्याग करून निसर्गाच्या सानिध्यात उघड्यावर राहतात. आज बुधवारी सकाळी, दुपारी घरात गोडधोड जेवण करून, दुपारनंतर गावाचे मुख्य रस्ते आणि घरे ओस पडतील.

“विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी, आपल्या संस्कृतीचा आणि देवस्थानच्या आदेशाचा मान राखणे ही आमची परंपरा आहे,” असे स्थानिक जाणकार सांगतात.

आज रात्री जिथे शहरे रोषणाईने उजळलेली असतील, तिथे शिराळा गाव मात्र देवाच्या आज्ञेखातर पूर्णपणे अंधारात आणि शांततेत असेल. ही परंपरा सिंधुदुर्गच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडवणारी ठरत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *