कणकवली नगरपंचायत दोन जिल्हाध्यक्षांची प्रतिष्ठापणाला ! 

प्रभाग क्र. १७’ मध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक विरुद्ध युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आमने सामने

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)

कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना कणकवलीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कणकवली नगरपंचायतीतील प्रभाग क्र. १७ हा संपूर्ण निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी प्रभाग ठरत आहे. दोन वेगवेगळ्या पक्षांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची राजकीय कसोटी या प्रभागातून लागण्यास सुरुवात झाली आहे.या प्रभागात भाजपा–राष्ट्रवादी युतीचे उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि शहर विकास आघाडीच्या व ठाकरे शिवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक एकमेकांच्या समोर ठाकले असून दोन्ही बाजूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे हा प्रभाग कोणाकडे झुकतोय याकडे केवळ कणकवली नव्हे, तर समस्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत एकूण चित्र ‘भाजपा विरुद्ध शहर विकास आघाडी’ असे आहे. मात्र प्रभाग १७ मध्ये भाजपाने राष्ट्रवादीच्या पारड्यात मत टाकत हा प्रभाग अबिद नाईक यांच्यासाठी राखून ठेवला आहे. दुसरीकडे शहर विकास आघाडीने ठाकरे गटाच्या युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांना उमेदवारी दिल्याने ‘हेवी वेट’ उमेदवारांची सरळ टक्कर निर्माण झाली आहे.

वेगवेगळ्या प्रभागातून पुन्हा आमने-सामने २०१८ मध्ये अबिद नाईक हे प्रभाग ४ मधून विजयी झाले होते, परंतु यंदा हा प्रभाग ‘इतर मागास महिला प्रवर्ग’ राखीव झाल्याने त्यांना प्रभाग १७ मध्ये उतरावे लागले आहे.तर सुशांत नाईक हे मागील दहा वर्षांपासून नगरसेवक आहेत. ते मागील निवडणुकीत प्रभाग १३ मधून विजयी झाले होते. मात्र यावेळी तो प्रभाग मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने ते दहा वर्षांपूर्वी ज्या प्रभागातून त्यांनी निवडणूक लढवली त्या कनक नगर अर्थात प्रभाग १७ मधून पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहेत. या दोन्ही नेत्यांनी आपल्या-जुने प्रभाग बदलून ‘लक्षवेधी’ प्रभागातून पुन्हा उतरल्याने चुरस कमालीची वाढली आहे.

अबिद नाईक यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी संवाद बैठका घेऊन मतदारांना आवाहन केले असून “अबिद नाईक व समीर नलावडे यांना मत म्हणजे विकासाला मत, म्हणजे आम्हाला मत” असे आवाहन त्यांनी केले आहे.तसेच माजी जि.प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी सभापती सुरेश सावंत, माजी नगरसेवक बाबू गायकवाड, गजा देसाई, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह संपूर्ण टीम प्रचारात गुंतली आहे. तर दुसऱ्या बाजूस युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रचारासाठी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, शिवसेना उपनेते संजय आग्रे, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्यासह शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर आणि सर्व कार्यकर्ते जोरदारपणे यंत्रणा सांभाळत आहेत.

या प्रभागात एकूण ३६९ पुरुष व ३४५ महिला मिळून ७६४ मतदार आहेत. यापैकी ६५० मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून दोन्ही उमेदवारांसमोर किमान ३५० मतांचे टार्गेट आहे.कणकवली नगरपंचायतीतील १७ प्रभागांपैकी हा १७ क्रमांकाचा प्रभाग सर्वाधिक चर्चेत असून या दोन्ही दिग्गजांच्या एन्ट्रीमुळे या प्रभागाचा निकाल संपूर्ण नगरपंचायतीच्या समीकरणात महत्वाचा ठरणार आहे.
या प्रभागाचा निकाल केवळ दोन्ही उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय घेणार नाही, तर संपूर्ण कणकवली नगरपंचायतीतील सत्ता समीकरणे बदलण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे या प्रभागावर सर्वांचे लक्ष खिळले असून निकालापर्यंत हा प्रभाग राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *