दोन भाईत सरशी कोणाची ! कणकवली नगरपंचायतीच्या राजकीय आराखडा रंगतोय

शहर विकास आघाडी विरुद्ध भाजप’ : पारकर–नलावडे यांच्यातील प्रतिष्ठेची लढत निर्णायक टप्प्यात

 

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात कणकवली हे नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री देणारे हे शहर राजकीय नाट्यमय घडामोडींमुळे राज्यात सतत चर्चेत राहते. राज्यातील राजकीय समीकरणे काहीही असली तरी कणकवलीचा राजकीय पॅटर्न वेगळाच आणि अनेकदा ‘निर्णायक’ ठरलेला आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या नगरपंचायत निवडणुकीत निर्माण झालेला ‘शहर विकास आघाडी’ हा एकत्रित राजकीय प्रयोग सध्या संपूर्ण जिल्ह्यात नव्हे राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. ठाकरे गट, शिंदे गट, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी अशा विविध पक्षांचे नेते एकत्र येणे हा पूर्वी कधी न पाहिलेला ‘कणकवली पॅटन’ मानला जात आहे.

निवडणुकीची रणधुमाळी शिगेला – वातावरण तापले! कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी थेट दुरंगी लढत रंगत असून राजकीय वातावरण तापले आहे. एकेकाळी परस्पर विरोधात असणारी अनेक नेतेमंडळी आता भाजपचा प्रभाव रोखण्यासाठी एकत्र आघाडी उभी करत आहेत.

याच वेळी समीरभाई नलावडे व संदेशभाई पारकर हे दोन्ही दिग्गज पुन्हा एकदा आमनेसामने. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत अवघ्या ३४ मतांनी पारकर यांचा पराभव करून नलावडे नगराध्यक्ष बनले होते. या वेळी मात्र समीकरणे मोठ्या प्रमाणात पालटलेली दिसत आहेत.

समीर नलावडे : विकासाचे चेहरा की भाजपची प्रतिष्ठा ? मागील पाच वर्षांत कणकवलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे मार्गी लागली. उड्डाणपूल, हायवे डेव्हलपमेंट, विविध नागरी सुविधा, क्रीडा संकुल, सांस्कृतिक उपक्रम यामुळे नलावडे हे ‘विकासाचा चेहरा’ म्हणून प्रचार करत आहेत.

नलावडे यांचा दावा —
“कणकवलीला आधुनिक शहर बनवण्याचा मानस; पुन्हा एकदा संधी द्या.”या निवडणुकीत भाजपसाठी कणकवली प्रतिष्ठेची लढत बनली असून १७ पैकी सर्व जागांवर विजय मिळवण्याचा डंका भाजपने वाजवला आहे.

संदेश पारकर : अनुभवी नेतृत्व आणि नव्या आघाडीचा चेहरा ,कणकवलीतील राजकारणाचा इतिहास पाहिला तर संदेश पारकर हे एक अत्यंत अनुभवी नाव. १९९० च्या दशकात ग्रामपंचायतीचे तरुण सरपंच, नंतर नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांनी नेतृत्व केले. नंतरच्या काळात कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द ठळक ठरली.

अलीकडील दोन पराभवानंतर पारकर काहीसे शांत होते. कुटुंबातील सलग दुःखद घटनांमुळे त्यांनी राजकारणापासून काहीसा अलिप्तपणा राखला. परंतु विविध पक्षांतील नेत्यांशी असलेले सौहार्दपूर्ण संबंध, त्यांच्या अनुभवाची गरज आणि सत्ताधाऱ्यांविषयी वाढत जाणारी नाराजी यामुळे शहर विकास आघाडीने त्यांच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली.

पारकर यांची घोषणा —
“कणकवलीची जनता माझे सोनं आहे; त्यांच्यासाठीच मी पुन्हा मैदानात उतरलो.”

मौनातून मैदानात – पारकरांच्या ‘कमबॅक’ची चर्चा पारकर यांनी मनातली खदखद व्यक्त केली नसली तरी भाजपविरोधात ‘सक्षम चेहरा’ म्हणून त्यांच्यावर सर्वच विरोधी पक्षांचा विश्वास बसला. भाजपच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी तेच सर्वोत्तम पर्याय असल्याचे चित्र निर्माण झाले. परिणामी संपूर्ण विरोधकांचे लक्ष पारकरांवर केंद्रीत झाले आणि शहर विकास आघाडी त्यांच्याभोवती एकत्र आली.

यंदाची निवडणूक — ‘नलावडे VS पारकर’ हीच खरी लढत
अनेक पक्ष, गट, आघाड्यांची चर्चा जरी असली तरी प्रत्यक्ष स्पर्धा दोन प्रमुख चेहऱ्यांमध्येच आहे समीर नलावडे – भाजप विरुद्ध संदेश पारकर शहर विकास आघाडी अशी आहे.

राजकीय प्रतिष्ठा, विकासाचे दावे, भूतकाळातील विजय–पराभव, आघाड्यांची गणिते, मतदारांची नाराजी किंवा विकासाची अपेक्षा… या सर्वांचा मिलाफ पाहता ही निवडणूक अत्यंत रोचक बनली आहे.
कणकवलीचे राजकीय वातावरण नेहमीच राज्यातील समीकरणांवर परिणाम करणारे राहिले आहे.यंदा ‘कणकवली मॉडेल’मुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.पारकर-नलावडे यांची प्रतिष्ठेची लढतच अंतिम परिणाम ठरवेल.

कणकवली नगरपंचायतीची निवडणुक निर्णायक टप्प्यावर आली असून आता कणकवलीसमोर दोन भिन्न मॉडेल आहेत ते म्हणजे भाजपचे ‘विकास मॉडेल’ आणि
शहर विकास आघाडीचे ‘पर्यायी नेतृत्व मॉडेल’
यामुळे मतदारांनी यातील कोणावर विश्वास ठेवायचा यावरच शहराचे पुढील पाच वर्षांचे भविष्य अवलंबून आहे.

कणकवलीच्या राजकीय परंपरेनुसार…
निर्णय काहीही असो, कणकवली पुन्हा एकदा सिंधुदुर्गच्या राजकारणाला दिशा देणार हे निश्चित!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *