देवगड (प्रतिनिधी)
युनेस्कोच्या यादीत विजयदुर्ग किल्ला समाविष्ट झाल्याने विजयदुर्गवासियांची जबाबदारी वाढली – जिल्हाधिकारी अनिल पाटील
विजयदुर्ग किल्ल्याची निवड युनेस्कोच्या यादीत झाल्याने पर्यायाने जागतिक वारसा स्थळात हा किल्ला समाविष्ट झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आनंद व्यक्त केला. आज त्यांनी विजयदुर्ग किल्ल्याला भेट दिली. त्यांच्या हस्ते विजयदुर्ग किल्ल्यातील भवानी मातेच्या मंदिरात भवानीमातेला पुष्पहार अर्पण करून तसेच श्रीफळ वाढवून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पर्यटकांना तसेच इतिहास अभ्यासकांना या घटनेमुळे एक प्रकारचा खजिना प्राप्त झाला आहे. छत्रपतींचा इतिहास या १२ किल्ल्यांच्या माध्यमातून त्यांना स्फूर्ती देईल. याचबरोबर येथील स्थानिक ग्रामस्थांची जबाबदारीही वाढली असून किल्ले स्वच्छता, पर्यटकांचे आदरातिथ्य आणि यातून रोजगार निर्मिती कशी होईल यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, सरपंच रियाज काझी, प्रदीप मिठबावकर, दिनेश जावकर, इतिहासप्रेमी राजेंद्र परूळेकर, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बिड्ये, शैलेश खडपे यानी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
