मिठबाव रामेश्वर मंदिरात पत्रकार बंधूंचा एकत्रित सन्मान हे आमचे सुभाग्य – दयानंद मांगले
मिठबाव ग्रामदेवालय जिर्णोद्धार समिती व श्री देव रामेश्वर देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने केले आयोजन
कुणकेश्वर महाशिवरात्रीला अनेक देवस्वाऱ्या श्री देव कुणकेश्वर भेटीसाठी दाखल झाल्या. परंतु या येणाऱ्या देवस्वाऱ्यांमध्ये सर्वाधिक श्रद्धेने दाखल झाल्या त्यादोन देवस्वाऱ्या म्हणजे ३९ वर्षांनी येणारा आचरा श्री देव रामेश्वर व सुमारे ३०० वर्षांनी येणारा मिठबाव श्री देव रामेश्वर यांचा देवस्वाऱ्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. एकूण दहा देवस्वाऱ्या यावर्षी महाशिवरात्रीला दाखल झाल्या होत्या.त्यामध्ये सुमारे तीनशे वर्षांनी दाखल होणाऱ्या मिठबाव श्री देव रामेश्वर देवस्वारीचे चांगल्या पद्धतीचे नियोजन व शिवतीर्थावर दर्शन घेताना आम्हाला पाहायला मिळाले.मिठबाव रामेश्वर मंदिरात अनेक उपक्रम राबविले जातात त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते.आमच्याकडे तशा प्रसिद्धीसाठी बातम्या मिळाल्या बातमी कुणाची आहे, कशी आहे यापेक्षा बातमीला किती महत्त्व आहे हे ओळखून सर्व पत्रकार बंधूंनी या देवस्वारी भेट व उत्सवाच्या बातमीला प्रथम प्राधान्य दिले. पत्रकार मंडळींनी आपल्या दैनिकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी दिली .आमच्या आजपर्यंतच्या पत्रकारितेतील कारकीर्दीत वाडा येथील हनुमान जयंतीच्या निमित्ताने सर्व पत्रकारांना एकत्र बोलवून त्यांच्या सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आम्हा सर्व पत्रकारांच्या येथे यथोचित सत्कार करण्यात आला हे आमचं सुभाग्य असल्याचे आम्ही समजतो. आपल्या देवस्थानच्या सर्व उपक्रमांना माझे पत्रकार मंडळी कायम सहकार्य करीत राहतील असा विश्वास देवगड तालुका पत्रकार समितीचे उपाध्यक्ष दयानंद मांगले यांनी व्यक्त केले.
मिठबाव,कातवण, तांबळडेग या तीन गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर मिठबाव येथे श्री देव रामेश्वर मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळा मिठबाव ग्रामदेवालय जिर्णोद्धार समिती व श्री देव रामेश्वर देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित पत्रकार सत्कार कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी मिठबाव ग्रामदेवालय जिर्णोद्धार समिती व देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार हेमंत कुळकर्णी (प्रहार,प्रहार डिजिटल), पत्रकार दयानंद मांगले (रत्नागिरी टाइम्स),पत्रकार राजीव पडवळ (तरुण भारत)पत्रकार सुरज कोयंडे (पुढारी) पत्रकार अयोध्या प्रसाद गावकर (लोकमत),पत्रकार विश्वास मुणगेकर(सकाळ),पत्रकार नागेश दुखंडे(कोकणसाद), पत्रकार प्रशांत वाडेकर (नवराष्ट्र, पुण्यनगरी) पत्रकार स्वप्निल लोके(सागर, महाराष्ट्र माझा),पत्रकार गणेश आचरेकर (सिंधुदुर्ग 24 तास) आदींचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने सकाळपासूनच मंदिरात धार्मिक विधी रुद्राभिषेक आरती मंत्र पुष्पांजली, संध्याकाळी सामुदायिक हरिपाठ, स्थानिक गायकांच्या सुश्राव्य गायन स्थानिक भजने गजानन प्रसादिक भजन मंडळ बांदिवडे बुवा रुपेश मेस्त्री यांचे भजन अधिकारी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.मिठबाव, कातवण तांबळडेग गावातील मुंबई स्थित असलेली चाकरमानी मंडळीही उत्सवासाठी प्रामुख्याने दाखल झालेली होती त्यामुळे मंदिरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.तिन्ही गावातील गावघर रयतेने एकत्र येत मोठ्या भक्तीमय वातावरणात श्री देव रामेश्वरचा दहावा वर्धापन दिन उत्सव मोठ्या दिमाखास साजरा केला.