देवगड, दि. ११ (प्रतिनिधी)
ट्राफिकच्या वादातून शिरगाव बाजारपेठेत धुमश्चक्री
८ जणांनी ६५ वर्षांच्या वृद्धाला दांड्याने, दगडाने, खुर्चीने मारहाण करून केले जखमी; शिरगाव येथील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ट्राफिकच्या कारणातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान अखेर मारहाणीमध्ये होऊन शिरगाव बाजारपेठेत एका वृद्ध व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये ६५ वर्षीय दिपक गोविंद तावडे यांना प्लास्टिक खुर्ची, लाकडी दांडे, दगड, व मातीच्या कुंडीने मारहाण करत गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी शिरगाव येथील आठ जणांविरुद्ध देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनेचा तपशील असा आहे की, शिरगाव बाजारपेठेत राहणारे दिपक गोविंद तावडे (६५) व संकेत चव्हाण (२५) यांच्यात ट्राफिकच्या कारणावरून वाद झाला होता. या वादात दोघांनी एकमेकांना हाताने मारहाण केली. त्यानंतर संकेत चव्हाण यांनी संतोष चव्हाण (२४), सोनू मोंडकर (२८), ओंकार मोंडकर (३०), प्रमोद चौकेकर (३५), संतोष शेट्ये (३२), आर्यन दर्जी (२२) व श्रेयस श्रीगरे (२६) यांना सोबत घेऊन तावडे यांच्या घरी धडक दिली.
या टोळक्याने तावडे यांना घरातच घुसून मारहाण केली. यामध्ये आर्यन दर्जी याने प्लास्टिक खुर्चीने मारले, तर संकेत चव्हाण, संतोष चव्हाण, सोनू मोंडकर व ओंकार मोंडकर यांनी लाकडी दांड्याने हल्ला केला. प्रमोद चौकेकर, संतोष शेट्ये व श्रेयस श्रीगरे यांनी मातीची कुंडी व दगड वापरून मारहाण केली. या मारहाणीत तावडे यांच्या उजव्या हाताच्या तळव्याला व डाव्या पंजावर गंभीर जखमा झाल्या.
या प्रकरणी तावडे यांनी देवगड पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी संकेत चव्हाण व इतर सात जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ११८(१), १८९(२), १९१(२), १९०, १३१, ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र महाडिक हे करीत आहेत.
