तिर्लोट आंबेरी येथील श्रीशा भाबल आत्महत्या प्रकरण ; पती सासू सासरे यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी
तिर्लोट – आंबेरी येथील शिरीषा उर्फ श्रीशा सुरज भाबल (२४) हिला तिच्या लहान मुलांसमवेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला तिचा पती सुरज सुहास भाबल (३७), सासरे सुहास शिवराम भाबल (७७), सासू सुहासिनी सुहास भाबल (६५, सर्व रा. तिर्लोट आंबेरी) या संशयितांना विजयदुर्ग पोलिसांनी शनिवारी देवगड न्यायालयासमोर हजर केले. देवगड न्यायालयाने तीनही संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
श्रीशा भाबल (२४) हिला तिचे पती सुरज, सासरे सुहास, सासू सुहासिनी, नणंद सौ. पूजा सदाशिव जोगल (३०, रा. मिठबाव, पूर्वाश्रमीची पूजा भाबल) हे संशयित शिवीगाळ करून मानसिक व शारिरीक त्रास देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून श्रीशाला जगणे असह्य झाल्याने तिने १५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.४५ वा. ते १६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वा. च्या मुदतीत आपले मुलगे श्रेयश (वय ५) व दुर्गेश (वय ४) यांना सोबत घेऊन तिर्लोट आंबेरी पूलावरून खाडीच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली होती.
याबाबतची फिर्याद श्रीशाची आई श्रीमती चंद्रकला लोकेश कुमार (३८, सध्या रा. अंबरनाथ (प.) ठाणे, मूळ रा. रायचूर कर्नाटक) यांनी विजयदुर्ग पोलिसांत दिली होती. या फिर्यादीनुसार सर्व संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून श्रीशाचा पती सुरज, सासरे सुहास, सासू सुहासिनी या संशयितांना अटक केली होती. शनिवारी तीनही संशयितांना विजयदुर्ग पोलिसांनी देवगड न्यायालयासमोर हजर करून संशयितांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. संशयितांच्यावतीने ॲड. कौस्तुभ मराठे यांनी युक्तिवाद करून पोलीस कस्टडीच्या मागणीला हरकत घेतली. संशयितांकडून घटनेतील कोणताही मुद्देमाल मिळविणे बाकी नसल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी, असा युक्तिवाद ॲड. मराठे यांनी केला. मात्र, न्यायालयाने तीनही संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.