अमली पदार्थ विक्री विरोधात कठोर भूमिका – पालकमंत्री नितेश राणे
सावंतवाडी मतदारसंघातील अमली पदार्थ विक्री, ऑनलाइन गेम्स, मटका, जुगार, वेश्या व्यवसाय व इतर अनैतिक प्रकार बंद झालेच पाहिजेत. त्याचप्रमाणे चोरट्या गोमांस विक्रीवर बंदी कडक कारवाई केली जाईल. या सर्वबाबींच्या विरोधात सरकार म्हणून आमची कठोर भूमिका आहे, याचे भान अधिकाऱ्यांनी ठेवावे. अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केल्यास काहीना घरी पाठवावे लागेल असा, सज्जड इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज सावंतवाडी येथील पर्णकूटी विश्रामगृहावर पत्रकारांचे बोलताना दिला.
गोवा राज्यातील पर्यटन आता कमी झाले आहे. आपल्या जिल्ह्यात कौटुंबिक पर्यटन वाढवावे याकडे विशेष लक्ष दिले जात असून त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी लवकरच मी हॉटेल मालकांशी संवाद साधणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यांमध्ये डिजिटल ग्रंथालय होण्यासाठी माझे प्रयत्न असून त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्ह्यातील डीएड, बीएड बेरोजगारांवर अन्याय होऊ देणार नाही. याविषयी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहेत, सरकार त्यांची काळजी घेईल, असे नितेश राणे यांनी सांगितले.
सावंतवाडी येथे बुधवारी सायंकाळी खाजगी कार्यक्रमासाठी श्री. राणे आले असता पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवींद्र मडगावकर, माजी नगरसेवक उदय नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा वाढलेला उपद्रव आणि त्यापासून शेतकरी बागायतदार यांचे होणारे नुकसान लक्षात घेता वन्य प्राण्यांपासून मुक्तता मिळण्यासाठी लवकरच जिल्ह्यात 80 कोटी रुपये खर्चून प्राणी संग्रहालय उभारण्यात येईल. त्यासाठी उपवनसंरक्षकांनी ओरस आणि कुडाळ अशा दोन ठिकाणचा प्रस्ताव दिल्याचे त्यांनी सांगितले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयांना चालना देण्यासाठी तसेच येथील विद्यार्थ्यांना एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यात डिजिटल ग्रंथालय असा नवीन प्रयोग आपण करणार असल्याचेही मंत्री राणे यांनी सांगितले.