देवगड (प्रतिनीधी)
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन जामसंडे बुद्धविहार संपन्न ; शोक गीते, अभिवादन रॅली काढत आठवल्या आठवणी
सम्यक प्रबोधिनी जामसंडे (मुंबई) गाव शाखा मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन जामसंडे बुद्धविहार येथे शोक गीते, अभिवादन रॅली व अभिवादन सभेने संपन्न झाला. दि.५ डिसेंबर रोजी रात्री १०ते१२ या वेळात स्थानिक कलाकारांचा “बाबा तुझी आठवण येते” या भीम गीत जागर शोक गीतांचा कार्यक्रम झाला. या शोक गीत कार्यक्रमात घनश्याम जाधव, मिलिंद जामसंडेकर, सुशील जाधव, सोनाली जाधव यांनी गीत गायनातून बाबांच्या आठवणींना उजाळा दिला. या गीत गायन कार्यक्रमाला युवकानी व उपस्थितानी चांगली साथ दिली. त्यानंतर अभिवादनाचा कार्यक्रम झाला. दि.६ डिसेंबर रोजी संध्याकाळी आंबेडकर भवन ते सांस्कृतिक केंद्र अशी शिस्तबद्ध व शांततामय वातावरणात अभिवादन रॅली काढण्यात आली. बुद्ध विहारात रॅलीची सांगता झाल्यानंतर अभिवादन सभेचा कार्यक्रम झाला.
आर्या मणचेकर, सामाजिक कार्यकर्ते पी. वाय कांबळे, शिक्षक सचिन रायपुरे, माजी अध्यक्ष एम. के. जामसंडेकर, अध्यक्ष विलास जाधव या वक्त्याने बाबासाहेबांच्या जीवन संघर्षमय कार्यावर प्रकाशझोत टाकला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद व युवा पिढीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव राजेंद्र जाधव यांनी केले.

