देवगड (प्रतिनीधी)
शिरगाव राक्षसघाटी येथे रानगव्यांच्या धडकेत अपघातांच्या घटनांमध्ये वाढ; उपाययोजना करण्याची मागणी
मौजे शिरगाव (राक्षसघाटी), ता. देवगड येथे वारंवार रानगव्यांच्या धडकेत वाहन अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला गवे रेडे रस्त्यावर येऊ नयेत म्हणून बॅरिकेट लावावी अशी मागणी भाजपा नेते संदीप साटम यांनी केली होती.
या सूचनेची दखल घेऊन वनविभाग व सार्वजनिक बांधकाम यांनी पाठपुरावा सुरू केला असून रा. द. घुणकीकर, वनक्षेत्रपाल, कणकवली यांनी या आशयाची मागणी करणारे पत्र कार्यकारी अभियंत्यांना लिहिले आहे.
पत्रात म्हटले आहे की या घटनांमुळे वाहनचालकांसह वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या दुर्घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
वनक्षेत्रपाल कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांना यासंदर्भात पत्र पाठवून दुर्घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे.
प्रस्तावित उपाययोजना:
1. अपघातप्रवण क्षेत्रात वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी हॉर्न वाजविण्याबाबत सूचनाफलक लावणे.
2. संबंधित ठिकाणी गतिरोधक बसवणे.
3. वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी संरक्षणात्मक कुंपण उभारणे, जेणेकरून वाहनांना आणि वन्यप्राण्यांना इजा होणार नाही.
वनक्षेत्रपालांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्वरित उपाययोजना राबवण्याची विनंती केली आहे. या पत्राची प्रत उपवनसंरक्षक, सावंतवाडी यांना सादर करण्यात आली आहे.
