व्यसनमुक्तीची वारी, विठ्ठलाच्या दारी ; नशाबंदी मंडळाचा अनोखा उपक्रम
देवगड (प्रतिनिधी) १८ जुलै २०२४
आपल्या समाजावर संताच्या विचार धारेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. म्हणूनच तर दरवर्षी लाखो भक्तगण संत अभंग गात पंढरीची वारी करतात. त्यात कीत्येकजण वारीत गळ्यात तुळशीची माळ घालून व्यसनमुक्त राहण्याचा संकल्पही करतात.हाच हेतू लक्षात घेऊन नशाबंदी मंडळ आणि महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार देवगड या हायस्कूल यांनी संयुक्तपणे व्यसनमुक्तीची वारी, विठ्ठलाच्या दारी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन सोमवार १५ जुलै रोजी केले होते.
यावेळी व्यसनमुक्तीचा विचार सांगितलेल्या संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत रोहीदास,संत तुकाराम,संत कबीर यांची तसेच ज्योतिबा-सावित्री फुले, शाहू महाराज, अशा सुधारणावादी महामानवाच्या विचारानुसार आपल्या जीवनाची वाटचाल असली पाहिजे. आपल्याला कोणत्याही संतांनी व्यसनं करा असे सांगितले नाही. तरीही अनेकजण या विचारांना डावलून व्यसनांच्या आहारी जातात संत वचनांचा अनादर करतात. आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर संत वचनांचा आदर करून त्या विचारांना आत्मसात केले पाहिजे असे सांगून विद्यार्थ्यांना व्यसनांचे प्रकार दुष्परिणाम आणि उपाययोजना याबाबत जनजागृती करत ,आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाकडे आमचा सिंधुदुर्ग व्यसनमुक्त कर असे साकडे घालु. असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी केले.
या कार्यक्रमादरम्यान व्यसनमुक्तीची शपथ ही घेण्यात आली. यावेळी तळेबाजार हायस्कूलचे मुख्याध्यापक घोगळे सर, संस्थाधिकरी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतरकर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
