देवगड (प्रतिनिधी)
आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन म्हणून न पाहता, समाजाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावेल असे समाजोपयोगी शिक्षण घ्यावे, असे आवाहन देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले.
ते मिठबाव येथील क्षात्रोकुलोत्पन्न मराठा समाज संचलित रामेश्वर हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव व अध्यापक महाविद्यालय, मिठबावच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी त्यांनी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन करत संस्थेच्या शताब्दी व अमृत महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. ही शिक्षणसंस्था अशीच शिक्षणाची ज्योत पिढ्यान्पिढ्या उजळत राहो आणि येथील विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्ज्वल घडो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
आपल्या सेवाकालाचा अनुभव सांगताना तहसीलदार पवार म्हणाले की, या गावात मला तलाठी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पुढे पदोन्नतीच्या माध्यमातून नायब तहसीलदार आणि तहसीलदार या पदापर्यंत काम करता आले, हे मी माझे सौभाग्य समजतो. आज या शताब्दी व अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी संस्थेने मला आमंत्रित केले, याबद्दल मी संस्थेचा ऋणी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
संस्थेच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, अध्यापक महाविद्यालयाने संपूर्ण महाराष्ट्रात शिस्त, गुणवत्ता आणि संस्कार यांचा आदर्श निर्माण केला आहे. येथून घडलेले शिक्षक ज्या ठिकाणी जातात, तेथे नवे शैक्षणिक आदर्श निर्माण करतात. संस्थेच्या पत्रव्यवहारातील तांत्रिक अडचण तत्काळ सोडविण्यास संस्थेने दिलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमास क्षात्रोकुलोत्पन्न मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत डिचोलकर, मिठबाव सरपंच भाई नरे, विश्वस्त अंकुश डगरे, भीमसेन आचरेकर, भाऊ डगरे, चंद्रशेखर फाटक, धर्माजी गावकर, रामचंद्र वाळके, रवींद्र कुवेसकर, माजी सभापती भाई पारकर, आबा लोके, बी. एस. डगरे, अमोल लोके, एम. के. लोके, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले, तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक आर. आर. राऊत यांनी केले. शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांना प्रेरणा दिली.
