कणकवली (प्रतिनिधी)
शिवाजीनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत शंकर साटम (७६) यांच्या पिशवीतील १ लाख रुपयांची रोकड आठवडयात बाजारात हातचालखीने अज्ञाताने लंपास केली. ही घटना मंगळवार सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत घडली. चोरीच्या प्रकारानंतर शुक्रवारी शशिकांत साटम यांनी कणकवली पोलीस गाठले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत अधिक वृत्त असे की, शशिकांत साटम हे मंगळवारी एका पतसंस्थेतील त्यांच्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी कणकवली शहरात आले. त्यांनी पतसंस्थेत जात आपल्या खात्यावरील एक लाख रुपयांची रक्कम काढली. ही रक्कम त्यांनी पिशवीत ठेवली. मात्र, पिशवीची चैन तुटली असल्याने ती ओढण्यासाठी त्यांनी बाजारात हात पिन खरेदी केले.
त्यानंतर साटम हे बाजारात टॉवेल खरेदी केले. याचदरम्यान त्यांच्या पिशवीत ५०० रुपयांची दोन बंडल अससेली १ लाख रुपयांची रोकड अज्ञातांनी हातचालाखी करून लंपास केली. काही वेळानंतर त्यांनी पिशवीतील रोकड लंपास झाल्याचे त्यांना दिसून आले. रोकड लंपास झाल्याने शशिकांत साटम यांना धक्का बसला. त्यानंतर साटम यांनी घर गाठून घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी पैशांची चोरी झाली, त्याठिकाणीचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. मात्र, त्यांना पैसे नेमके कुणी चोरल्याचे दिसून आले नाही.
