सावंतवाडी (प्रतिनिधी)
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम रखडल्याबद्दल वाढती नाराजी लक्षात घेऊन रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांनी सोशल मीडियावर सुरू केलेल्या डिजिटल स्वाक्षरी मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत हजारो नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे.
दहा वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र दशक उलटूनही टर्मिनसचे काम अपूर्णच असल्याने प्रवाश्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कामाबाबत वारंवार निवेदने, आंदोलने करूनही रेल्वे प्रशासनाकडून ठोस हालचाल न झाल्याचा आरोप प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे.
मोहीमेला सावंतवाडीकरांसह कोकण रेल्वे प्रवाश्यांचा उत्स्फूर्त सहभाग
शहरातील तसेच चाकरमान्यांसह अनेक कोकणप्रेमींचा या डिजिटल स्वाक्षरी मोहिमेला मोठा पाठिंबा मिळत आहे. विविध व्हॉट्सॲप गटांमधून स्वाक्षरीसंदर्भातील संदेश शेअर करण्यात येत असून, युवक व प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
सावंतवाडीतून नवीन एक्सप्रेस गाडीची तातडीची मागणी
तुतारी एक्सप्रेसप्रमाणे सावंतवाडीतून मुंबईमार्गे आणखी एक एक्सप्रेस गाडी तातडीने सुरु करण्याची गरज असल्याचेही प्रवाश्यांकडून सांगण्यात येत आहे. वाढता प्रवासी भार, चाकरमान्यांची दैनंदिन ताणतणावाची यात्रा यामुळे अतिरिक्त गाडीची मागणी जोर धरत आहे.
कोकणी जनतेची मुख्यमंत्र्यांकडे अपेक्षा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भूमिपूजनातील अपूर्ण टर्मिनसचे काम आता तातडीने मार्गी लावून प्रकल्प पूर्ण करावा, अशी मागणी कोकणी जनतेकडून करण्यात येत आहे.
सावंतवाडी–सिंधुदुर्ग परिसराच्या विकासासाठी हा टर्मिनस महत्त्वाचा असून, तो लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा, यासाठी नागरिकांनी डिजिटल माध्यमातून एकजूट दाखवली आहे.
