आपल्या सोबत महासंघ नेहमीच आहे : प्रसाद पारकर

0 minutes, 3 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

 

आपल्याला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेची आवश्यकता आहे, हे जाणून त्यावेळी ही संघटना उभी केली आहे. व्यापाऱ्यांच्या विविध समस्यांचा अभ्यास महासंघ करत असतो. त्यादृष्टीने योग्य ते निर्णय महासंघ नेहमीच घेत आले आहेत. आपणही आपल्या व्यापाऱ्यांसाठी आयोजित करत असलेल्या उपक्रमांना महासंघ नेहमीच सहकार्य करेल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले. ते तळेरे आदर्श व्यापारी संघटनेच्या 69 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते.

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसाद पारकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन तर डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके,डॉ. मिलिंद कुलकर्णी, सहकार्यवाह तथा तळेरे आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार, निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर, उपसरपंच संदीप घाडी, माजी सभापती दिलीप तळेकर, रमाकांत वरुणकर, कार्याध्यक्ष अमोल सोरप, विशेष सत्कारमूर्ती सदाशिव पांचाळ, देवकी तळेकर, सचिन पावसकर, श्रीपत पाताडे, प्रतिभा पाटील, नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्ष पपी वायंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना डॉ. मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, आपल्या व्यवसायात आपुलकी जेवढी वाढेल त्यावेळी प्रत्येक स्पर्धेत आपण पुढेच असणार आहोत, मागे कुठेही राहणार नाही. आपण सर्वजण एकमेकांवर अवलंबून आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी एकमेकांची काळजी केली पाहिजे आणि स्पर्धा करताना चांगुलपणा वाढवून आधुनिकतेकडेही वळले पाहिजे.

 

तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार म्हणाले की, पुढील एक वर्ष आम्ही परिवर्तन वर्ष साजरे करणार आहोत. त्यासाठी 1 दिवसाचे चिंतन शिबिर आयोजित करून व्यापाऱ्यांसमोर असलेल्या विविध समस्यावर मार्गदर्शन केले जाईल.

 

यावेळी वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक भावनेतून काम करत असल्याबद्दल डॉ. मिलिंद कुलकर्णी, शैक्षणिक गुणवत्तेबद्दल सावी मुद्राळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवडीबद्दल देवकी तळेकर, तळेरे विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीबाबत प्राचार्य अविनाश मांजरेकर, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

 

व्यापाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी देण्यात येणारा कै. दत्तात्रय तुकारामशेठ जठार स्मरणार्थ यशस्वी उद्योजक पुरस्कार सचिन पावसकर यांना, कै. परशुराम कृष्णाजी तळेकर स्मरणार्थ उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार आदित्य महाडिक यांना, कै. लक्ष्मी गुरुनाथ कल्याणकर स्मरणार्थ उत्कृष्ट सामाजिक संस्था श्री गणेशकृपा सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, कासार्डे बंडवाडी यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 

यावेळी सूर्यकांत तळेकर, दिलीप तळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रसाद पारकर, पपी वायंगणकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आभार आणि सूत्रसंचालन राजू जठार यांनी केले. त्यानंतर श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ आणि तारादेवी फुगडी मंडळ केळुस वेंगुर्ले यांचा फुगडी सामना, आणि कुडाळ येथील रंगी रंगला महाराष्ट्र हा कार्यक्रम झाला.

 

यावेळी अशोक तळेकर, संतोष कल्याणकर, सुयोग महाडिक, प्रवीण वरुणकर, चंद्रशेखर डांबे, राजू पिसे, आदित्य महाडिक, आप्पा कल्याणकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, व्यापारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *