“रामेश्वर तुझा महिमा अघात ! मिठबावमध्ये सुमारे ३०० वर्षांनी अनुभवला शिवलग्न व सोनेलुटीचा सोहळा”

0 minutes, 7 seconds Read

देवगड (प्रतिनिधी)

 

रामेश्वर तुझा महिमा अघात ! मिठबावमध्ये सुमारे ३०० वर्षांनी अनुभवला शिवलग्न व सोनेलुटीचा सोहळा”

 

 

मिठबाव श्री देव रामेश्वराचा विजयादशमी उत्सव दिमाखात संपन्न

 

 

शिवलग्न व शिवकळे सोबत सोने लुटण्याचा दिव्य सोहळा पाहताना गाव उपस्थित रयतेचे उर भरून आले.याला निमित्त होते विजयादशमीच्या उत्सवाचं. सुमारे ३०० वर्षानंतर हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहताना प्रत्यक्ष या सोहळ्याचे साक्षीदार होता आले. शिवलग्न सोहळा व शिवकळे सोबत सोने लुटण्याचा आनंद यावेळी गाव रयतेला मिळाला हे जणू रयतेचे भाग्यचं ! गावरयतेला प्रश्न होता – सर्व ठिकाणी शिवलग्न, सोने लुटण्याचा विजयादशमीचे उत्सव शिवकळेच्या साक्षीने होतोय, पण माझ्या देवाचा उत्सव मला कधी पाहायला मिळेल ? मात्र हा आल्हाददायक सोहळा यावर्षी घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत प्रत्यक्षदर्शी पाहून आम्ही धन्य झालोय. “रामेश्वरा, तुझा महिमा अघात आहे” अशा प्रतिक्रिया यावेळी गावकऱ्यांकडून व्यक्त झाल्या.

 

 

 

मिठबाव, तांबळडेग, कातवण ही तीन गावे जरी आज महसुलीच्या दृष्टीने वेगळी झाली असली तरी ईश्वराच्या दरबारात ही सर्व गाव रयत मिठबाव गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराची लेकरे आहेत. आज शिवकळेच्या आदेशाने सर्व बारापाच मानकरी व गावरयत पुन्हा गुण्या गोविंदाने एकत्र आली, ती कित्येक वर्ष खंडित असलेल्या गावरहाटीच्या पुनरुज्जीवनामुळेच.

 

 

मोठ्या भावाने हुकूम दिला आणि लहान भावाने आपल्या रयतेला कुणकेश्वर भेटीचा आदेश दिला.त्यानुसार शिवतीर्थावर कुणकेश्वर-रामेश्वर मनोमिलन झाले आणि रहाटीच्या वार्षिक उत्सवात सुरुवात झाली.

 

 

सर्वपित्रि अमावस्येला शिवकळेसह सर्व देवतरंग गावरयतेला सोबत घेत सागरतीर्थ श्री देवी गजबादेवी मंदिरस्थळाकडे निघाली. दहा दिवसांचा मुक्काम करून परतीच्या प्रवासासाठी शिवकळा व देवतरंग विजयादशमीदिनी सायंकाळी चारच्या दरम्यान शिवलग्न सोहळा व सोने लुटण्यासाठी मिठबाव आपटा पार (शिवकळा पारंपरिक सोने लुटण्याचे ठिकाण) येथे मार्गस्थ झाले.

 

 

यावेळी प्रथम कुलस्वामी मंदिर डगरेवाडी, पेडणेकरवाडी वेताळ देवस्थान, भंगसाळ स्थळी, हरिबाची वाडी विठ्ठल रखुमाई मंदिर, फाटकवाडी भवानी मंदिर, उत्कटवाडी गणपती मंदिर येथे भेटी देऊन शिवकळेसह सर्व देवतरंग बारापाच मानकरी, देवसेवेकरी, उपस्थित हजारो गावरयतेसह आपटा पार येथे दाखल झाले.

 

 

प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे – आपटा पार या ठिकाणी जाण्याचा मुख्य वाहतुकीचा मार्ग असूनही उत्सवाच्या दरम्यान कोणत्याही वाहनाला अडथळा होऊ नये याची दक्षता उपस्थित गावरयतेने घेतली होती. त्यामुळे मोठा उत्सव असूनही वाहतुकीत कुठेही अडथळा झाला नाही.

 

 

आपटा पार येथे आपटा वृक्षासभोवताली शिवकळेसह सर्व देवतरंगांनी पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर यजमानी श्री (मिराशी पटेल) राणे यांच्या हस्ते आपटा वृक्षाची पूजा संपन्न झाली. पूजा विधी आटोपल्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी ज्याची आस गावरयतेला होती तो मनोमिलन अर्थात शिव व शक्तीचा शिवलग्न सोहळा दिमाखात पार पडला. त्यानंतर शिवकळेसोबत सोने लुटण्याचा कार्यक्रम सुरू झाला. देवतरंग यांच्यासोबत गावरयतेला सोने लुटण्याची संधी मिळाल्याने रयतेचा आनंद द्विगुणीत झाला.

 

 

हा कार्यक्रम संपल्यानंतर पुढील प्रवास सुरू झाला. पुढील प्रवासात श्री देव रामेश्वराने स्वामी समर्थ मठात उपस्थित रयतेला आशीर्वाद दिला. विजय काळे यांच्या घरी गुळपाणी कार्यक्रमासाठी भेट देऊन देवस्वारी स्थिर झाली. या ठिकाणी देवतरंगाची विधिवत पूजा, ओटी भरणे व गावरयतेला गुळपाणी देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. याच ठिकाणाहून मानाचे श्रीफळ देवी सातेरी मंदिरात पाठविण्यात आले.

 

 

त्यानंतर बारापाच पूर्वज, देवी काळंबादेवी, लोके कुलस्वामी मंदिर, फाटक कुलस्वामी मंदिर, जोगल कुलस्वामी मंदिर या ठिकाणच्या नियोजित मार्गावर भेटी दिल्या. रात्री अकरा वाजता देवस्वारी श्री देव रामेश्वर दरबारी देवतरंग, बारापाच मानकरी, देवसेवेकरी व गावरयत पुन्हा दाखल झाली.

 

 

असा सुमारे 300 वर्षांनी श्री देव रामेश्वर मंदिराचा विजयादशमी उत्सव अर्थात दसरोत्सव मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *