नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांना पुन्हा लागणार लॉटरी ? नगराध्यक्ष पदाचे स्वप्न पाहणाऱ्या नगरसेवकांच्या स्वप्नांवर पडले विरजण

0 minutes, 2 seconds Read

देवगड (प्रतिनिधी)१४ ऑगस्ट २०२४

 

नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांना पुन्हा लागणार लॉटरी ? नगराध्यक्ष पदाचे स्वप्न पाहणाऱ्या नगरसेवकांच्या स्वप्नांवर पडले विरजण

 

राज्यशासनाच्या निर्णयाने देवगड नगराध्यक्षपदाला मिळाला पुर्णविराम ; संख्याबळ असूनही अविश्वास दर्शक ठराव आणणे अशक्य

 

देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्ष साक्षी प्रभू या आपला अडीच वर्षाचा कार्यकाल संपल्याने आपल्या नगराध्यक्षा पदावरून उतार झालेल्या विद्यमान नगराध्यक्षा साक्षी गजानन प्रभू यांना पुन्हा राज्य सरकारने घेतलेले निर्णयामुळे नगराध्यक्षपदाची लॉटरी लागण्याची शक्यता  आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे भाजपा नगरसेवकांनी पाहिलेल्या नगराध्यक्ष पदाच्या स्वप्नावर मात्र विरजण पडले आहे.नगरपंचायत मध्ये संख्याबळ असून अविश्वास ठराव आणणे देखील भाजपाला अशक्यप्राय असल्याने सत्तेची आणि नगराध्यक्ष पदाची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपाला आता पुढील निवडणुकीची वाट पहावी लागणार आहे.

 

नगराध्यक्षांचा कालावधी पाच वर्षे करण्याचा राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय देवगड जामसंडे न.पं मध्ये भाजपाला मोठा धक्का देणारा ठरला आहे.महाविकास आघाडीची न.पं.मध्ये सत्ता आल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या अनधिकृत बांधकामावरून अपात्रतेची कारवाई, उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत यांनी भाजपाला दिलेला पाठींबा, नगराध्यक्षा साक्षी प्रभू व नगरसेवक रोहन खेडेकर यांनी शिंदे गटात केलेला प्रवेश व त्यानंतर उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत यांचा थेट भाजपात प्रवेश करून महाविकास आघाडीला दिलेला मोठा धक्का यामुळे संख्याबळाच्या आधारावर अडीज वर्षानंतर आपलीच सत्ता येणार व आपलाच नगराध्यक्ष बसणार असा ठाम विश्वास भाजपा नगरसेवकांना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना, कार्यकत्र्यांना होता त्याचबरोबर जनतेलाही संख्याबळामुळे भाजपाचाच नगराध्यक्ष बसणार असे वाटत होते.

 

 

नगराध्यक्षा साक्षी प्रभू या शिंदे गटात गेल्या तरी न.पं.मध्ये भाजपाशी त्यांचे कधी जमले नाही व भाजपानेही त्यांना कायम कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.न.पं.हद्दीतील कचराप्रश्न पेटला व भाजपाने नगराध्यक्षांना चांगलेच धारेवर धरले.सभेमध्येही प्रत्येक विषयात भाजपाने नगराध्यक्षांना टार्गेट केले.मात्र यावेळी ठाकरे गटाचे नगरसेवक नगराध्यक्षांची बाजु घेवून लढले.न.पं.मधील अलिकडील सभेत तर भाजपा नगरसेवकांनी थेट नगराध्यक्षांना आव्हान करीत आता तुमचे दिवस संपले आमची सत्ता येणार, आमचा नगराध्यक्ष होणार मग बघू असे उघडउघड बोलून दाखविले.सत्तेची स्वप्ने पाहणारे भाजपा फक्त नगराध्यक्ष आरक्षणाची वाट पाहत होते मात्र आरक्षण प्रक्रिया लांबणीवर गेली यामुळे थोडी धाकधुक होती तरीही निवडणुका झाल्यावर आरक्षण प्रक्रिया पार पडून नगराध्यक्षपदाची निवडणुक होईल असे वाटत होते मात्र राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्षांचा कालावधी पाव वर्षे केल्याने भाजपाचा नगराध्यक्ष बसण्याचे स्वप्न भंग झाले आहे तर विद्यमान नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांना या निर्णयाने पुन्हा नगराध्यक्ष मिळण्याची शक्यता असल्याने त्यांचे नशीब फळफळले आहे.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *