दोडामार्गच्या देसाईचा ॲसिड हल्ल्यात हात ? म्हापसा येथून गेली पोलिसांनी अटक
सुकेकुळण-धारगळ, पेडणे येथे ऋषभ शेट्ये (वय १७) या विद्यार्थ्यावर ॲसिड हल्ला केल्याप्रकरणी निलेश देसाई ( कळणे – दोडामार्ग ) याला म्हापसा येथे पोलिसांनी अटक केली आहे. संशयित म्हणून त्याला ताब्यात घेतले आहे.
आज सकाळी ७.५०च्या दरम्यान अज्ञात दुचाकीस्वारांनी केलेल्या ॲसिड हल्ल्यात ऋषभ उमेश शेट्ये (१७) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारत आहे. ऋषभ म्हापशातील उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत असून आज सकाळी ७.५०च्या दरम्यान तो सुकेकुळण – धारगळ येथे बसची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकट्याने त्याच्यावर ॲसिड फेकले.
या हल्ल्यात दोडामार्ग तालुक्यातील एका व्यक्तीचा हात असण्याची शक्यता वर्तवली होती. काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका गंभीर घटनेचा सूड घेण्याचा हा प्रकार असावा असे पोलिसांना वाटते. सर्व बाजूंनी केलेल्या चौकशीअंती गोवा पोलिसांनी कळणे दोडामार्ग येथील नीलेश गजानन देसाई यास अटक केली आहे. या संपूर्ण घटनेला एका अर्धवट राहिलेल्या प्रेम प्रकरणाच्या सुडाची किनार असल्याची शक्यता असून पोलीस लवकरच या घटनेबाबत खुलासा करणार आहेत.