सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथे गवा रेड्याच्या हल्ल्यात एक १९ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. आदित्य रवींद्र परब, रा. माडखोल धुरीवाडी, असे या युवकाचे नाव आहे. ही घटना काल रात्री सुमारे साडे दहाच्या सुमारास माडखोल येथे व्ही.पी. कॉलेजसमोर घडली.
आदित्य आपल्या दुचाकीवरून घरातून सामान घेण्यासाठी माडखोल येथे जात असताना, व्ही.पी. कॉलेज परिसरातील झाडीतून अचानक एक मोठा गवा रस्त्यावर आला आणि त्याने आदित्यला थेट शिंगावरून उचलून बाजूच्या गटारात फेकले. या दुर्घटनेत आदित्यच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच गावातील युवक अमित राऊत, शैलेश माडखोलकर आणि अरविंद परब यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आदित्यला एका खाजगी वाहनाने सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलवण्यात आले आहे.
आदित्यची आर्थिक परिस्थिती नाजूक असून तो कोलगाव आयटीआयमध्ये शिक्षण घेत आहे. या अपघातामुळे त्याचा पाय जायबंदी झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी वनविभागाकडे त्याला तातडीने शासकीय मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.