देवगड (प्रतिनिधी)
रोजगार हमी,खारलँड बाबतच्या प्रलंबित कामाबाबत विलास साळसकर यांनी घेतली मंत्री गोगावले यांची भेट
देवगड मधील प्रलंबित विकास कामे ; तसेच तळेरे येथील कार्यालय स्थलांतर करणेबाबत दिले निवेदन
महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांची शिवसेनेचे देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी देवगड तालुक्यातील विविध विकासकामाबाबत चर्चा करून निवेदन दिले.
श्री. गोगावले यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात श्री. साळसकर यांनी त्यांची जिल्ह्याधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीदरम्यान भेट घेतली. यावेळी आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, उपनेते संजय आंग्रे, संजय पडते, मणचे सरपंच दीपक तोरसकर आदि उपस्थित होते. यावेळी त्यांनी मंत्री गोगावले यांना देवगड तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत अवगत केले. मंत्री गोगावले यांनी त्यांना सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. श्री. साळसकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, देवगड तालुक्यात रोजगार हमी योजनेमधून घेण्यात आलेले सण 2014-15 पासूनची अर्धवट स्थितीत असलेली प्रतिबंधक बंधारे कामे पूर्ण करण्यात यावीत. तळेरे येथे असणारे खारलँड कार्यालय देवगड मध्ये स्थलांतर करण्यात यावे. वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपाची धुपप्रतिबंध बंधारे कामे रोजगार हमी योजनेतून घेण्यात यावीत. त्यासाठी विशेष बाब म्हणून शासन निर्णय काढावा.जेणेकरून शेतजमिनीची धूप थांबेल.अकुशल मजुरांच्या मजुरीत वाढ करण्यात यावी.मणचे तिर्लोट मधील धुपप्रतिबंध बंधारे कामे खारलँड विभागाकडून घेण्यात यावीत. विकासकामाला अडथळा येणारा कांदळवन बाबतीत प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा. या प्रमुख मागण्या यावेळी शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी मंत्री गोगावले यांच्याकडे केल्या आहेत.
