शिडवणे नं. 1 शाळेत ‘बाल साहित्य संमेलन’ उत्साहात संपन्न
छंदच आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात :- संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
आपल्याला असलेली चांगली आवड मनापासून आणि सातत्यपूर्ण जोपासली पाहिजे. अलीकडची पिढी नैराश्याने ग्रासलेली असल्याने त्यांनी कोणताही एखादी चांगली आवड जोपासावी. कारण, छंदच आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात, असे प्रतिपादन संदेश पत्र संग्राहक, पत्रकार निकेत पावसकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं. 1 शाळेत ‘बाल साहित्य संमेलन’ अंतर्गत ‘लेखक / कवी / पत्रकार तुमच्या भेटीला’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध संदेश पत्र संग्राहक, लेखक, कवी आणि पत्रकार निकेत पावसकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत सुंदर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांच्या हस्ते निकेत पावसकर यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वरचित कवितांच्या वाचनाने झाली. मयुरी सुतार, केतन सुतार, श्रेयांश पांचाळ, आर्यन कासार्डेकर आणि श्रेया पाळेकर या युवा कवींनी आपल्या प्रतिभासंपन्न कवितांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे शालेय स्वराज्य मंडळाचे विद्यार्थी मुख्यमंत्री केतन सुतार आणि विद्यार्थिनी मुख्यमंत्री श्रेया पाळेकर यांनी घेतलेली निकेत पावसकर यांची हृद्य मुलाखत. या मुलाखतीत विद्यार्थ्यांनी श्री. पावसकर यांच्या परिचय, बालपण, लेखन, कविता, पत्रकारिता, हस्ताक्षर संग्रह, शालेय जीवन आणि विद्यार्थ्यांसाठी संदेश अशा विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रश्न विचारून त्यांच्या जीवन प्रवासाचा आणि अनुभवांचा पट उलगडला. यावेळी हा संग्रह जोपासताना आलेले वेगळे अनुभव, आठवणी तर पत्रकारिता करताना झालेले सकारात्मक बदल याबाबत सविस्तर पट उलगडला.
यावेळी बोलताना श्री. पावसकर म्हणाले की, पुस्तके वाचली पाहिजेत, आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे आणि त्यावर आपण त्रयस्थपणे व्यक्त झाले पाहिजे. आपले अनुभव शब्दांतून मांडण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्यातील सृजनशीलता फुलत जाईल. आणि त्यातूनच दर्जेदार लेखनही आपल्याकडून होत जाईल.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी केतन सुतार आणि शिक्षिका सौ. सीमा वरुणकर यांनी निकेत पावसकर यांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांना प्रेरणादायी हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरला. श्री. पावसकर यांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांना साहित्य, लेखन आणि पत्रकारिता या क्षेत्रांविषयी अधिक माहिती मिळाली, तसेच स्वतःच्या कलागुणांना विकसित करण्याची प्रेरणा मिळाली. शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.