देवगड/ प्रतिनिधी
आयएनएस गुलदार या युद्धनौकेवरील प्रस्तावित अंडरवॉटर म्युझियम ॲण्ड आर्टिफिशिअल रिफ आणि पाणबुडीचा प्रकल्प कुणकेश्वर समुद्रात करण्यात यावा अशी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली मागणी
आयएनएस गुलदार या युद्धनौकेवरील प्रस्तावित अंडरवॉटर म्युझियम ॲण्ड आर्टिफिशिअल रिफ आणि पाणबुडीचा प्रकल्प कुणकेश्वर समुद्रात करण्यात यावा, अशी मागणी कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच महेश ताम्हणकर व श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार समुद्रात स्थापित करून पाणबुडी प्रकल्प राबविण्याची संकल्पना अनेक वर्षांची होती. हा प्रकल्प देशातील पहिलाच प्रकल्प असून पर्यटनाच्यादृष्टिने महत्वाचा ठरणार आहे. हा अंडरवॉटर म्युझियम ॲण्ड आर्टिफिशिअल रिफ आणि पाणबुडीचा गुलदार प्रकल्प कुणकेश्वर समुद्रात होण्यासाठी येथील समुद्र खोली व भौगोलिक परिस्थितीचा विचार करता अनुकुल असल्याचे समजते. येथील पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी व पर्यटनवृद्धीसाठी हा कुणकेश्वर समुद्रात करावा, असे म्हटले आहे.
