शेठ म.ग. हायस्कूल, देवगड मध्ये वर्गखोली नामकरण सोहळा संपन्न

0 minutes, 0 seconds Read

देवगड (प्रतिनिधी)

शेठ म.ग. हायस्कूल, देवगड मध्ये वर्गखोली नामकरण सोहळा संपन्न

       देवगड एज्युकेशन बोर्ड ,मुंबई संचलित शेठ म.ग. हायस्कूल, देवगडमधील वर्ग खोली नामकरण *श्री. ना. द. कामत कक्ष* फलकाचे उद्घाटन देवगड एज्युकेशन बोर्डाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय  नारायण कामत यांचे चिरंजीव मृणाल कामत, कन्या सौ. प्रियवंदा शेखर रेगे, सौ. रश्मी  दीपक नाडकर्णी, श्री दीपक नाडकर्णी यांच्या हस्ते झाले. तसेच दुसऱ्या वर्ग खोली नामकरण फलकाचे उद्घाटन संयुक्त देणगीदार स्व. श्रीकांत देसाई यांचे भाचे दत्तात्रय खानविलकर, देणगीदार  श्रीमती शोभना उल्हास कार्लेकर यांचे प्रतिनिधी लक्ष्मण येरम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी मुख्याध्यापक व स्थानीय समिती सदस्य श्री चंद्रकांत शिंगाडे, स्थानीय समिती उपाध्यक्ष सौ. अर्चना नेने सदस्या सौ. अनुश्री पारकर, स्थानीय समिती खजिनदार श्री दत्तात्रय जोशी, सदस्य श्री मिलिंद कुबल, श्री विलास रूमडे, शाळेचे माजी पर्यवेक्षक आणि वाडा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री नारायण माने, मुख्याध्यापक श्री महादेव घोलराखे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

    यावेळी सर्व देणगीदारांचा संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

        

       यावेळी बोलताना नारायण कामत यांचे चिरंजीव श्री मृणाल कामत यांनी “आपल्या वडिलांनी काम केलेली देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई ही संस्था एक आदर्शवत संस्था असल्याचे प्रतिपादन केले. या संस्थेला देणगी दिल्याबद्दल आम्हा कामत कुटुंबीयांना खूप अभिमान वाटत आहे असे नमूद केले.यावेळी नारायण कामत यांच्या कन्या रश्मी नाडकर्णी आणि सौ. प्रियवंदा रेगे यांनी आपल्या वडिलांच्या गतस्मृतींना उजाळा दिला. शाळेने स्नेहपूर्वक केलेल्या आदरातिथ्याने भारावून गेल्याचे प्रतिपादन केले. शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

        यावेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक आणि  स्थानीय समिती सदस्य श्री चंद्रकांत शिंगाडे यांनी सर्व देणगीदारांचे शाळेच्या आणि संस्थेच्या वतीने आभार मानले. देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई ही एक नामांकित संस्था असून या संस्थेमध्ये कार्यरत असलेले पदाधिकारी स्वतः देणगी देऊन संस्था  चालवतात. 

 हा एक आदर्श समाजापुढे आहे, असे प्रतिपादन केले.  

    खजिनदार श्री दत्तात्रय जोशी यांनी देणगी बद्दल कामत कुटुंबीय,  खानविलकर कुटुंबीय, कार्लेकर कुटुंबीय व मोंडकर कुटुंबीयांचे ऋण  व्यक्त केले व देणगीतून मिळालेली रक्कम शैक्षणिक कामासाठीच वापरले जातील असा शब्द दिला. देणगीदार  श्रीमती शोभना उल्हास कार्लेकर यांचे प्रतिनिधी श्री लक्ष्मण येरम यांनीही आपले मनोगत  व्यक्त केले. 

      या सर्व देणगीदारांचा परिचय अ.कृ .केळकर हायस्कूल वाडा चे माजी मुख्याध्यापक श्री नारायण माने यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री महादेव घोलराखे यांनी तर निवेदन सहाय्यक शिक्षक श्री प्रवीण खडपकर यांनी तर आभार पर्यवेक्षिका सौ निशा दहिबावकर यांनी मानले. कार्यक्रमास शाळेच्या बालविभाग, प्राथमिक विभाग आणि माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *