बहुतेक मागण्या पुर्ण झाल्याने शिक्षक भारतीचे बेमुदत साखळी धरणे आंदोलन अखेर आठव्या दिवशी स्थगित
शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर व जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर यांनी दिली माहिती
सिंधुदुर्ग जि. प.माध्यमिक शिक्षण विभागातील अनेक वर्षापासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या असलेल्या प्रलंबित कामांसाठी तसेच प्रत्येक प्रस्तावाची चेक लिस्ट मिळावी,संघटना सहविचार सभा घेण्यात याव्यात, थकित वेतन,मेडिकल बीले, मुख्याध्यापक मान्यता,पोर्टल नियुक्त शिक्षक कर्मचारी नियमित मान्यता , वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी मान्यता व अन्य मागण्यांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्यावतीने सलग आठ दिवस बेमुदत साखळी धरणे आंदोलन जि.प.च्या प्रवेशद्वारावर सुरू होते. उपरोक्त मागण्यांपैकी बहुतांश मागण्या माध्यमिक शिक्षण विभागाने मान्य केल्याने सलग आठ सुरु असलेले आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर व जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर यांनी दिली. सदरचे आंदोलन सोमवार दि.१० मार्च पासून सुरु होते. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता.त्यानुसार सलग आठ दिवस ८ तालुक्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थळी मोठ्या संख्येने सहभागी होऊन साखळी धरणे आंदोलन यशस्वी केले.