खासदार नारायण राणे यांनी खारेपाटण येथील पूरग्रस्तांची घेतली भेट ; नुकसानीचे पंचनामे तातडीने शासनाकडे पाठवा ;अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
सुख नदीचा गाळ उपसणार ;दिले आश्वासन
कणकवली (तुळशीदास कुडतरकर)
कणकवली तालुक्यातील खारेपाटण बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण होऊन झालेल्या नुकसानीची भाजप नेते,केंद्रीय माजी मंत्री ,खासदार नारायण राणे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. ज्या कुटुंबांचे नुकसान झाले त्यांच्याशी त्यांनी थेट संवाद साधला. अधिकाऱ्यांना नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करून शासनाकडे त्याचा अहवाल पाठवा असे आदेश दिले. पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सुख नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम उन्हाळ्यात युद्ध पातळीवर केले जाईल असे आश्वासन यावेळी खासदार नारायण राणे यांनी दिले.
मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये प्रामुख्याने कणकवली तालुक्यातील खारेपाटण भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. येथील बाजारपेठेत मेडिकल, भूषारी दुकाने, हॉटेल्स, कापड दुकाने, बसस्थानक, मोबाईल शॉप, हार्डवेअर तसेच एका मंदिरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी आज खारेपाटण येथे भेट देउन नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली.
