तिलारी कालव्याच्या पाण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी रोणापालमध्ये धरणे आंदोलन ; माजी सरपंच सुरेश गावडे यांचा इशारा

 

 

बांदा (प्रतिनीधी)

 

तिलारी कालव्याच्या पाण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी रोणापालमध्ये धरणे आंदोलन ; माजी सरपंच सुरेश गावडे यांचा इशारा

 

   तिलारी कालवा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शेती बागायतीला मोठा फटका बसला आहे. कालव्यातून २६ जानेवारी पर्यंत रोणापाल ४४ किमी पर्यंत पाणी सोडण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन हवेत विरले आहे. येत्या चार दिवसात कालव्यातून रोणापालपर्यंत पाणी न आल्यास शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी कालव्यात बसून धरणे आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच सुरेश गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

तिलारी कालव्यातून पाणी सोडण्यासंदर्भात तातडीची पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी सुरेश गावडे यांनी तिलारी कालव्याच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. तिलारी कालव्याच्या पाण्याच्या आधारे शेतकऱ्यांनी माड व पोफळीची बागायती केली आहे. मात्र फेब्रुवारी महिना उजाडला तरीही कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतीसह पोफळी व माड बागायती करपून गेली आहे. पाणी सोडण्याबाबत तिलारी कालवा विभागाकडून केवळ खोटी आश्वासने दिली जात आहेत.

निगुडे येथे कालवा दुरुस्तीची कामे संबंधित ठेकेदारांकडून संथ गतीने सुरू आहेत. खोदाई केलेली माती कालव्यातच टाकण्यात आली आहे. ठेकेदारांवर अधिकाऱ्यांचा कोणताही वचक नसल्याने ठेकेदार मनमानीपणे काम करीत असल्याचे चित्र आहे. कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे कोणतेही सोयरसुतक नाही. तिलारी कालवा विभागाच्या मुख्य उद्देशालाच अधिकाऱ्यानी हरताळ फासला अशी टीका सुरेश गावडे यांनी केली.

पाण्याअभावी शेती बागायतीच्या होणाऱ्या नुकसानीस तिलारी कालवा विभाग पूर्णपणे जबाबदार राहील. पाणी सोडण्याबाबत शेतकऱ्यांची वारंवार फसवणूक करण्यात येत आहे. येत्या चार दिवसात तिलारी कालव्यातून पाणी रोणापालपर्यंत न आल्यास शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी कालव्यात बसून धरणे आंदोलन करण्याचा इशारा सुरेश गावडे यांनी दिला. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थित शेतकऱ्यांनीही समर्थन केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *