आजगाव येथे डंपर अपघात ; चालक जागीच ठार , मायनिंग वाहतूक चालू झालेनंतर पहिलीच घटना
सावंतवाडी आजगाहून साटेलीचे दिशेने जाणाऱ्या डंपरच्या चालकाचा डंपर वरील ताबा सुटल्याने डंपर रस्त्याच्या कडेला पलटी होत या डंपरवरील चालक जागीच ठार झाला. मायनिंग वाहतुकीला सोमवारी सुरूवात होत असताना ही वाहतूक काही वेळेसाठी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी रोखून धरली यानंतर ही वाहतूक सुरू करण्यात आली. मायनिंग वाहतूक सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच घटना अशी घडल्यामुळे पुन्हा एकदा मायनिंग वाहतुकीबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदरचा डंपरचा वेग जास्त असल्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवणे चालकाला कठीण झाल्यामुळे सदरचा अपघात झाल्याचे चर्चा मळेवाड चौकात सुरू आहे. अपघात स्थळ हे वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने शिरोडा पोलीस दुरक्षेत्राचे पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करून पुढील कार्यवाही केली आहे.