कणकवली दि २२ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
कणकवलीतील मतमोजणी २४ फेऱ्यांमध्ये होणार ; ६ टेबलवर टपाली,तर १४ टेबलवर ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे पोलिसांचे नियोजन
कणकवली,वैभववाडी, देवगड विधानसभा मतदारसंघात ६ टेबलवर टपाली; तर १४ टेबलवर ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी होणार आहे. एकूण २४ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. यासाठी ११६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कणकवली विधानसभेचा निकाल दुपारपर्यंत लागण्याची शक्यता असल्याचे निवडणूक निर्णय अधिकार जगदीश कातकर यांनी सांगितले.
मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, कणकवली कॉलेजमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कणकवली मतदारसंघात एकूण ३३२ मतदान केंद्रे असून यासाठी एकूण १४ टेबलवर मतमोजणी होताना, प्रत्येक ठिकाणी ३ कर्मचारी व टपाली मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर ४ कर्मचारी व इतर ५० कर्मचारी मिळून ११६ कर्मचारी काम पाहणार आहेत. एका फेरीत १४ केंद्रांची मतमोजणी होणार आहे. त्यावर नियंत्रण करण्यासाठी अधिकारी असणार असल्याचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी सांगितले.
नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर लढतीबाबत उत्कंठा
कणकवली विधानसभा मतदारसंघात खरी लढत विद्यमान आमदार नितेश राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्यात आहे. दोन्ही उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. मात्र मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या मतमोजणीसाठी महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांना उभे राहण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटल परिसर महायुतीचे उमेदवार नितेश राणे, अपक्ष उमेदवार संदेश पारकर, कणकवली नगरपंचायत रोड महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर, अपक्ष उमेदवार गणेश माने आणि कणकवली तहसील कार्यालय येथे अपक्ष उमेदवार बंदेनवाज खाणी,बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत जाधव यांच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशासनाकडून जागा निश्चित करण्यात आली आहे.
मतमोजणी काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी २५ पोलीस अधिकारी, १५० पोलीस, २ दंगल नियंत्रण पथके तैनात करण्यात येणार असल्याची माहिती कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली.
