झोपी गेलेला आमदार निवडणुका आल्यावर झाला जागा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे आमदार राणेंवर बोचरी टीका
दहा वर्षे आमदार असूनही पुलासाठी कोणताही पाठपुरावा केला नाही शिवाय आपल्याच पक्षातील नेत्यांची मागणी असलेला वळकुवाडी वरंडवाडी पूलाचा प्रश्न देखील ते अद्याप सोडू शकले नाही
विधानसभा निवडणुका समोर आल्यावर दहा वर्षे झोपी गेलेले आमदार नितेश राणे यांना अचानक जाग आली असून मंजूर झालेल्या मोंड वानिवडे पुलाच्या श्रेयाचा खटाटोप घेण्याचा ते करत आहेत. पुलाच्या पहिल्या टप्प्या संदर्भात आलेले पर्यावरण विभागाच्या परवानगीचे २६ मार्चला प्राप्त झाले आहे. या पुलाच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रयत्न भासवत आहेत. २०१६ साली तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून या पुलासाठी पाच कोटीचा निधी मंजूर झाला होता. या पुलासाठी त्या भागातील सिंधू सेवा प्रबोधनी संस्था व ग्रामस्थांनी पाण्यात उतरून आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाची गांभीर्याने महाविकास आघाडी सरकारने दखल घेत या पुलासाठी पाच कोटीचा निधी मंजूर केला होता.मात्र सिआरझेड व कांदळवन या दोन मुद्याचा प्रमुख अडसर असल्याने या पुलाचा प्रश्न मार्गी लागला नव्हता. अखेर २६ मार्च रोजी पर्यावरण विभागाने परवानगी दिल्याने या पुलाच्या कामाचा पहिला टप्पा मंजूर झाला आहे.मात्र यासंदर्भात आमदार नितेश राणे यांना सहा ते सात महिन्यांनी जाग येते एवढा झोपलेला आमदार मी कधी पाहिला नसल्याची खोचक टीका युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर केली आहे.
देवगड येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, व महिला आघाडीच्या सौ हर्षा ठाकूर, निनाद देशपांडे आदी उपस्थित होते .
यावेळी नाईक पुढे म्हणाले की, आमदार नितेश राणे यांना कुठलेही शाश्वत काम करायचे नसून निवडणुका आल्या की फंड गोळा करण्यासाठी मोठमोठी रस्त्यांची कामे घ्यायची व त्यातून टक्केवारी घ्यायची एवढेच काम ते करीत असल्याचेही ते म्हणाले. देवगड नळ योजनेचे काम इतके वर्ष रखडले होते.
मात्र, नगरपंचायत मध्ये शिवसेना महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर नगराध्यक्ष साक्षी प्रभू व नगरसेवक बुवा तारी आदींनी सहा महिन्यात पाठपुरावा करून पाणी आरक्षणाचा दाखला मिळविला.तसेच ५७ कोटीची नळ योजना मंजूर करून आणली . देवगड मधील एकाही शाश्वत कामांमध्ये आमदार नितेश राणे यांचे कोणतेही योगदान नसून फक्त निवडणुका आली की आपण काहीतरी केले हे भासवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम ते करीत आहेत असा घणाघाती आरोपही युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला आहे.