देवगड (प्रतिनिधी)
देवगड स्टॅन्ड येथे एसटीत बसण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड झालेल्या धक्काबुक्कीत १७ वर्षीय कॉलेज युवतीच्या पायाला दुखापत
देवगड आगारातून सायंकाळी ४:१५ वाजता सुटणारी देवगड तांबळडेग ही गाडी देवगड एसटी स्टँड येथे फलाटावर लावत असताना कॉलेज विद्यार्थांनी एसटी बस बसण्यासाठी झुंबड केली या विद्यार्थ्यांच्या झुंबडीमध्ये एका १७ वर्षीय कॉलेज युवतीच्या पायाला दुखापत झाली आहे.या युवतीच्या उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात नेले घटनेची माहिती समजताच एसटी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली.व तिच्या पालकांना धीर दिला, जखमी कॉलेज युवतीच्या उपचारासाठी एसटीच्या वतीने एक हजार रुपयांची मदत दिली असून इतर आणखी ही मदत एसटीच्या वतीने उपलब्ध करून दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, दहिबाव घाडीवाडी येथील संजीवनी नारायण घाडी (१७) राहणार दहीबाव घाडीवाडी ही देवगड येथे न.शा.पंत वालावलकर महाविद्यालयात इयत्ता बारावी सायन्स शाखेत शिकत आहे. सायंकाळी कॉलेज सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे एसटी स्टँड येथे गाडीसाठी आली.देवगड आगारातून सायंकाळी ४:१५ वाजता सुटणारी देवगड तांबळडेग एम एच २० डी ११७५ ही बस चालक लवू सावंत व वाहक जे एस कदम हे फलाटावर गाडी लावत असताना फलाटावर उभ्या असलेल्या कॉलेज च्या विद्यार्थांनी गाडी पकडण्यासाठी एकच झुंबड केली.यामुळे झालेल्या धक्काबुक्कीत १७ वर्षीय कॉलेज युवती खाली पडली व तिच्या उजव्या पायाला गाडीचा पत्रा लागल्याने पायाला दुखापत झाली आहे. या जखमी कॉलेज युवतीला तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी देवगड युथ फोरमचे अध्यक्ष अँड सिद्धेश माणगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी नेले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ देवगड कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य शरद शेटे तसेच एसटी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप, देवगड सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजन जाधव, आशिष कदम, प्रवीण सावंत यांनी देखील रुग्णालयात धाव घेतली.घटनेची माहिती समजताच त्या युवतीचे वडील देखील रुग्णालयात आहे. तिच्या पायावर देवगड रुग्णालयात उपचार करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या घटनेमुळे देवगड आगारातून सुटणाऱ्या सर्व गाड्या काही काळ थांबविण्यात आल्या होत्या. व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांनी तात्काळ एसटी कडून एक हजार रुपयाची मदत जखमींना दिली. तसेच इतर मदत मिळवून दिली जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी या प्रकारामुळे देवगड आगारातील सगळ्या थांबविण्यात आलेल्या एसटी फेऱ्या त्या त्या ठिकाणी मार्गस्थ केल्या.
देवगड एसटी स्टँडवर येथे गाडी फलाटावर लावतानाच बसण्यासाठी प्रत्येक प्रवाशांची झुंबड असते. त्यात सायंकाळी महाविद्यालय सुटले की स्टँड परिसरात महाविद्यालयीन मुलांची गर्दी असते त्यामुळे असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत.
