गणेशोत्सवासाठी मेंगलोर एक्सप्रेसने गावी येत असताना मुणगे येथील आत्माराम सावंत याचा रेल्वेतून पडून मृत्यू
मुणगे सावंतवाडी येथील आत्माराम शरद सावंत (३०) याचा रत्नागिरी- आरवलीदरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास घडली. गणेशोत्सवासाठी तो आपल्य गावी येत होता. मेंगलोर एक्सप्रेसने मुंबई ते कणकवली असा प्रवास करताना ही घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, आत्माराम हा गेली सात वर्षे मुंबई- जोगेश्वरी येथे राहत होता. मुंबई येथे खासगी वाहनांवर तो चालक म्हणून काम करीत असे. त्याची घरची परिस्थिती बेताची असून तो घरचा आर्थिक भार सांभाळत होता. गणेशोत्सवासाठी शनिवारी पहाटे मेंगलोर एक्सप्रेसने तो प्रवास करीत होता. मात्र, रत्नागिरी- आरवली प्रवासादरम्यान रेल्वेतून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने आत्मारामला रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरा आत्मारामच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्माराम हा मनमिळावू होता. त्याचा मित्रपरिवार मोठा होता. पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहीण, दोन काका काकी, चुलत भाऊ – बहीण असा मोठा परिवार आहे.