देवगड (प्रतिनिधी) ३०जुलै २०२४
ऑनलाईन नाहीतर ऑफलाइन तरी धान्य दया ; मिठबाव रेशन चालकाच्या मनमानी विरोधात महिला आक्रमक
देवगड तहसीलदार यांची भेट घेत दिले निवेदन
जुलै महिना संपत आला तरी धान्य दुकानात पॉज मशीन वर अंगठा लागत नसल्याने जवळपास पंधरा दिवस लोकांना येऊन माघारी फिरवावी लागत आहे. आजचा एक दिवस महिना अखेरीस शिल्लक आहे. दिनांक ३० जुलै रोजी तारीख महिला रेशनवर आल्या होत्या. मात्र रेशनवर मशीनवर अंगठा लागत नाही. ऑफलाईन धान्य देण्याची सुविधा नाही. त्यामुळे रेशन दुकान चालकाने मनमानी करून धान्य दुकान बंद करून अन्यत्र गेले. त्यामुळे संत्रप्त महिलांनी आक्रमक होत मिठबाव सरपंच भाई नरे यांची भेट घेत त्यांच्या हा सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यांनी तात्काळ रेशन दुकान चालक यांना यासंदर्भात जाब विचारला. मात्र गावचे प्रथम नागरिक असून देखील त्यांना समर्पक अशी उत्तरे दिलेली नाहीत. त्यामुळे त्यांनी नायब तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला आपल्याकडून लोकांना धान्य मिळणे बाबत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका घेतली. नायब तहसीलदार यांची देवगड येथे मिठबाव सरपंच व येथील काही नागरिक यांनी भेट देत त्यांना धान्य दुकानावर मिळणाऱ्या वागणुकीची समस्या सांगीतली.

मिठबाव नंबर १ या धान्य दुकानावर मिठबाव मधील काही तसेच तांबळडेग गावातील संपूर्ण रेशन कार्ड धारक यांना धान्य वितरित केले जाते. मिठबाव व तांबळडेग हे अंतर साधारणता चार ते पाच किलोमीटर आहे . तांबळडेग येथील लोकांना धान्यासाठी पाच किलोमीटर यावे लागते काही वेळेस पर्यायी गाडी नसते. मात्र धन्य दुकानावर आल्यावर कधी अंगठा लागत नाही तर कधी रेशन दुकान बंद अशा समोसा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे संतप्त झालेल्या रेशन कार्डधारक महिला आज आक्रमक झाल्या. दरम्यान या संतप्त झालेल्या महिलानी सरपंच भाई नरे यांच्या नेतृत्वाखाली देवगड तहसीलदार कार्यालयात जात रेशनचालक करत असलेल्या मनमानी कारभार निदर्शनास आणून दिला. सर्वर डाऊन असल्याने ऑनलाइन धान्य पुरवठा होत नाही यासाठी ऑफलाइन धान्य पुरवठा व्हावा याबाबत निवेदन दिले.

यावेळी मिठबाव सरपंच भाई नरे ,सुनील गावकर, रूपाली कुमठेकर ,साक्षी कुबल, महेश मयेकर, गणेश आर्लेकर आदीसह महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या.
