कळसुली – हळवल मार्गावरील बेजबाबदारपणे होणारी डंपर वाहतूक थांबवा.! ; अपघात होता होता वाचला ; प्रसंगी रस्त्यावर उतरू ; हळवल पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा इशारा

0 minutes, 3 seconds Read

 

 

कणकवली (प्रतिनिधी)

 

हळवल येथे खडी वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे संतप्त नागरिकांनी थेट डंपर अडवला. या मार्गावर ओवळीयेप्रमाणे दुर्घटना घडू देणार नाही, असा इशारा जमलेल्या नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. शिवडाव – कळसुली परिसरातील ए. पी. सावंत यांच्या क्रेशरवरून खडी वाहतूक सुरू होती. संबंधित डंपर कणकवलीच्या दिशेने येत असताना चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे उघड झाले. हळवल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयादरम्यान रस्त्यावर चालकाने दोन तरुणांना अक्षरशः हुलकावणी दिली. ही घटना अत्यंत गंभीर ठरू शकली असती, अशी माहिती उपस्थितांनी दिली. मागून येणाऱ्या प्रवाशांनी चालकाच्या संशयास्पद वर्तनाची माहिती दिल्यानंतर नागरिकांनी तत्काळ डंपर थांबवून चालकाची चौकशी केली. त्यावेळी चालकाचा परवाना तपासला असता तो २०१२ सालापासूनच मुदतबाह्य असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

 

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पडळकर, पोलीस हवालदार विनोद चव्हाण व पांडुरंग कळंत्रे घटनास्थळी दाखल झाले.नागरिकांनी परप्रांतीय चालकांकडून बेजबाबदारपणे वाहन चालवले जात असल्याचा आरोप करत अशा चालकांना या मार्गावर वाहतूक करू देणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. क्रेशरची वाहने जर अशीच बेफिकीरपणे धावत राहिली तर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.

 

 

परप्रांतीयांना चालक म्हणून नेमु नका, वाहनचालकांचे परवाने तपासा, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला. तसेच हळवल रेल्वे फाटक परिसरात पोलीस तैनात करावेत व मद्यधुंद चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पडळकर यांनी संबंधित चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, असा विश्वास नागरिकांना दिला.

 

 

दरम्यान, एवढी गंभीर घटना घडूनही महसूल यंत्रणा अद्याप सक्रिय झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. अवैध व धोकादायक खडी वाहतुकीला काही राजकीय व प्रशासकीय पाठींबा असल्याचाही आरोपही यावेळी करण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर पोलीस व महसूल यंत्रणा कोणती ठोस उपाययोजना राबवते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान हळवल कळसुली मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *