महायुतीच्या माध्यमातून ५ ऑक्टोबर रोजी कणकवली शहरात निघणार आरक्षण बचाव रॅली – अंकुश जाधव

 

कणकवली दि २७ सप्टेंबर (तुळशीदास कुडतरकर)

 

महायुतीच्या माध्यमातून ५ ऑक्टोबर रोजी कणकवली शहरात निघणार आरक्षण बचाव रॅली – अंकुश जाधव 

आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली भव्य आरक्षण बचाव रॅली चे नियोजन; मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी व्हा – नामदेव जाधव यांचे आवाहन

 

*कणकवली दि २७ सप्टेंबर (तुळशीदास कुडतरकर)*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो हक्क दिलेला आहे तो संपुष्टात आणण्याचा निर्धार काँग्रेसचे नेते आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला दिसतो. आरक्षण हा आमचा हक्क असून आम्ही आरक्षण संपवू देणार नाही. म्हणूनच महायुतीच्या माध्यमातून तसेच कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथे विधानसभा क्षेत्रासाठीची भव्य आरक्षण बचाव रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपा अनुसूचित जमातीचे जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ते कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजप अनुसूचित जमातीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे, गौतमी कदम, शैलेंद्र जाधव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रशांत जाधव, मंडळ अध्यक्ष देवगड देवदत्त कदम आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना अंकुश जाधव म्हणाले, राहुल गांधींचे वक्तव्य हे संविधानाने अनुसूचित जाती जमाती सह इतर प्रवर्गाला आरक्षणाचा हक्क दिलेला आहे. तो संपुष्टात आणण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केलेला दिसतो. त्यामुळे आम्ही याला विरोध करणार असून आमच्या हक्काचे आरक्षण हिसकावू देणार नाही. यासाठीच कणकवली विधानसभेत आरक्षण बचाव रॅली महायुतीच्या घटक पक्षांना सोबत घेऊन काढण्यात येणार आहे. ही रॅली ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जानवली पुलाकडून सुरु होणार आहे. त्यांनतर कणकवली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून शिष्टमंडळाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात संविधान बचाव रॅलीचे सभेत रूपांतर होणार आहे.

राहुल गांधींची प्रवृत्ती आणि विचारांना विरोध करण्यासाठी आरक्षण बचाव रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे. आरक्षण हा आपल्या प्रत्येकाचा अधिकार असून तो हिसकावून घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला कडाडून विरोध करायचा आहे. म्हणूनच सर्व नागरिकांनी एकत्रित येत या आरक्षण बचाव रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन भाजप अनुसूचित जमातीचे जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव यांनी केले.

जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श लागलेल्या जानवली गावातून आरक्षण बचाव रॅली ची सुरुवात होणार आहे. तसेच आमचा हा समाज वर्षानुवर्षे हक्काने समाजात वावरतो. शिक्षण, नोकरी व इतर स्तरावर जो अधिकार त्यांना आहे तो काढून घेण्याचे व आरक्षण संपविण्याचे काम राहुल गांधी व काँगेसकडून होईल असे दिसून येते. म्हणून आम्ही याला विरोध करणार आहोत.आमच्या शिष्टमंडळाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.आम्ही राहुल गांधी यांचे वक्तव्य, भुमिका स्विकारत नाही.आमच्या हक्काचे आरक्षण हिसकावू देणार नाही.हा थेट संदेश या आरक्षण बचाव रॅलीच्या माध्यमातून देणार आहे.या आरक्षण बचाव रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा भाजप अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *