कृषी दर्जा मिळाल्याने मच्छिमारांनाही कर्जमाफी द्यावी ; देवगड फिशरमेन्स सोसायटीच्या बर्फ कारखान्याच्या व्याजात सवलतीची मागणी

0 minutes, 2 seconds Read

देवगड (प्रतिनिधी)

मच्छिमारी व्यवसायाला राज्य शासनाने कृषी दर्जा दिल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजना, सवलती व कर्जमाफीचा लाभ मच्छिमारांनाही देण्यात यावा, तसेच देवगड फिशरमेन्स को-ऑप. सोसायटीच्या बर्फ कारखान्यावरील कर्जाच्या व्याजात भरीव सवलत देण्यात यावी, या मागणीसाठी देवगड येथील मच्छिमारांनी पालकमंत्री मा. नितेश राणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

 

देवगड फिशरमेन्स को-ऑप. सोसायटी लिमिटेड, देवगड यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देवगड तालुक्यातील मच्छिमार संस्थांनी मच्छिमारी व्यवसायासाठी केसीसी कर्ज घेतलेले आहे. राज्य शासनाने मच्छिमारीला कृषी दर्जा दिल्यामुळे कृषी क्षेत्रातील कर्जमाफी व इतर सवलती मच्छिमारांनाही लागू व्हाव्यात, अशी सर्वसामान्य मच्छिमार व संबंधित संस्थांची अपेक्षा आहे. शासनाने जिल्हा बँकांच्या माध्यमातून वितरित केलेल्या कर्जमाफी योजनांमध्ये मच्छिमारांच्या केसीसी कर्जाची माहितीही समाविष्ट करून त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

तसेच राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) योजनेअंतर्गत देवगड फिशरमेन्स सोसायटीला बर्फ कारखाना व शीतगृह उभारणीसाठी प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी सुमारे १ कोटी ४ लाख रुपये इतका खर्च मंजूर करण्यात आला असून त्यापैकी कर्ज व भागभांडवलाच्या स्वरूपात आर्थिक मदत देण्यात आली होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून मच्छिमारांना मासळी साठवणूक करण्यासाठी बर्फ पुरवठा करण्याचा उद्देश होता.

 

मात्र गेल्या काही वर्षांपासून मत्स्यउत्पादनात घट झाल्यामुळे बर्फ विक्रीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. त्याचबरोबर बर्फ कारखान्यासाठी आवश्यक असणाऱ्या विजेचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले असून प्रकल्पासाठी लागणारा पाणीपुरवठाही अपुरा पडत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढत जाऊन प्रकल्प तोट्यात गेला आहे. परिणामी बर्फ कारखाना मागील काही वर्षांपासून बंद ठेवावा लागला असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे.

 

सध्या संस्थेकडे मासळी विभाग व डिझेल विभाग असे दोनच विभाग कार्यरत असून त्यातून मिळणाऱ्या मर्यादित उत्पन्नातून संस्थेचा कारभार चालवावा लागत आहे. त्यामुळे बर्फ कारखाना व शीतगृह विभागावरील कर्जाचे व्याज भरणे संस्थेला कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने सदर कर्जावरील व्याज माफ करावे किंवा व्याजदरात भरीव सवलत देऊन संस्थेला आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

या मागण्यांसंदर्भात पालकमंत्री मा. नितेश राणे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी देवगड येथील नौकामालक श्री. शामराव पाटील, मनोहर बांदेकर, शंकर कुबल, बाबुराव ढोके तसेच तज्ञ संचालक सचिन कदम आदी उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *