सिंधुरत्न योजनेतून ३०० दशावतार कलाकारांना पेहराव देण्याचा प्रस्ताव सादर

0 minutes, 0 seconds Read

 

दोडामार्ग (प्रतिनिधी)

सिंधुरत्न योजनेतून ३०० दशावतार कलाकारांना पेहराव देण्याचा प्रस्ताव सादर

सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ पिकुळे या नाट्य कंपनीचा दोडामार्ग तालुक्यासह मुंबई, पुणे गोवा या ठिकाणीही डंका वाजतोय. या मंडळाला आपण शुभेच्छा देत त्यांच्या भावी वाटचालीस आपली कायम मदत असेल. तसेच सिंधुरत्न योजनेतून दशावतार कलाकारांना त्यांचा पेहराव देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यात ३०० कलाकारांचा समावेश असल्याचे शिंदे शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई यांनी स्पष्ट केले.

पिकुळे येथे सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाच्या तृतीय वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ॲड. पी.डी. देसाई, ॲड. अनिल गवस, माजी सभापती दयानंद धाउकर, सैनिक बँक अध्यक्ष विठ्ठल गवस, पत्रकार सुहास देसाई, माजी मुख्याध्यापक संतोष घोगळे, प्रकाश वर्णेकर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

श्री देसाई म्हणाले, कै. रामा उर्फ दादा रत्नु गवस यांच्या संकल्पनेतून हे नाट्यमंडळ सुरु झाले आहे. मालक शत्रू गवस, अमित गवस, रत्नदीप गवस यांनी या नाट्य मंडळाचा विस्तार केला. गेली तीन वर्षे अहोरात्र मेहनत केलेल्या या वेलीचा लवकरच वटवृक्ष होईल, कै. रामा रत्नु गवस यांच्या कार्याला ती श्रद्धांजली असेल. केवळ नाट्य प्रयोग करून न थांबता सामाजिक बांधिलकीतून हे मंडळ विविध कार्यक्रम राबवते. सामाजिक हित जोपासण्यासाठी नेहमीच कटीबद्ध आहे हेच या नाट्य मंडळाचे वैशिष्ट्य असल्याचे यावेळी प्रेमानंद देसाई म्हणाले.

दहावीत तृतीय आलेल्या कु. मानसी सुनील गवस, सॉफ्टबॉल खेळात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भूमी हनुमंत सावंत हिचा तसेच पत्रकारितेत आदर्श पुरस्कार प्राप्त सुहास देसाई व प्रमोद गवस यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच मालक शत्रू गवस यांचा याचं दिवशी म्हणजे १४ मे रोजी वाढदिवस असल्याने शिवाय नाट्य मंडळाच्या वाटचालीत मोलाचा वाटा उचलून ही लोककला वृद्धिंगत करण्यासाठी हातभार लावत असल्या बाबत विशेष सत्कार करण्यात आला. या नाट्य मंडळाचे मालक ,पत्रकार रत्नदीप गवस यांची दोडामार्ग पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, यासाठी त्यांचाही सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनीही सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाचे कौतुक करत गौरवॊद्गार काढले.

सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळातील कलाकारांनी ‘”साक्षात्कार” हा दशावतार नाट्य प्रयोग सादर केला याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद गवस यांनी तर आभार रत्नदिप गवस यांनी मानले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *