देवगड (प्रतिनिधी)
बापर्डे गावाला राज्यस्तरावर ओळख मिळवून देणारे ग्रामसेवक शिवराज राठोड यांच्या कर्तृत्वाला कौतुकाची नवी झालर
गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामसेवक शिवराज राठोड यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने विशेष सन्मान
सन 2019/20 या कालावधित गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बापर्डे या गावात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तत्कालीन ग्रामसेवक श्री. शिवराज राठोड यांचा विशेष सन्मान सोहळा दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी संत एकनाथ रंगमंदिर,छत्रपती संभाजी नगर येथे मा. मंत्री, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
धाराशिव ही जन्मभूमी असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याला आपली कर्मभूमी मानून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.
बापर्डे गावात ग्रामसेवक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर मेहनत, दूरदृष्टी आणि गुणवत्ता यांच्या जोरावर अनेकविध उपक्रम प्रभाविपणे राबवले आहेत. घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व शुद्धीकरण, प्लास्टिक बंदी, सोलर ऊर्जा वापर यांसारखे नावीन्यपूर्ण आणि पर्यावरण पूरक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या माध्यमातून गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात बापर्डे ग्रामपंचायतने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन श्री. शिवराज राठोड यांचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला.
ग्रामविकास आणि ग्रामस्वच्छता अभियानातील त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सध्या ते किंजवडे येथे ग्रामसेवक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि सचोटीच्या माध्यमातून ते याहीपेक्षा दैदीप्यमान यश संपादन करतील असा विश्वास जनसामान्य आणि अधिकारी वर्गातून व्यक्त होत आहे.
