देवगड/ प्रतिनिधी
विवाहितेला चाकूचा धाक दाखवून नायलॉन दोरीने बांधून बाथरूममध्ये कोंडून ठेवल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल ; देवगड नाडण येथील घटना
कौटुंबिक वादातून विवाहितेला चाकूचा धाक दाखवून तिचे हातपाय नायलॉन दोरीने बांधून बाथरुममध्ये कोंडून बाहेरून लॉक लावून तिला बंदिस्त करणाऱ्या नाडण वरची पुजारेवाडी येथील स्मिता गणेश घाडी (६०), अमिता अनिल बाणे (६२), दिव्या गणेश घाडी (३२), अनिल गणपत बाणे (६३), सुनीता सूर्यकांत बाणे (६४) या संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी पहाटे २ वा. च्या सुमारास घडली. पीडित विवाहितेने घटनेची माहिती पोलिसांच्या ११२ नंबरवर तात्काळ दिल्याने पीडित विवाहितेची देवगड पोलिसांनी घटनास्थळी जात सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता ही मंगळवारी पहाटे २ वा. च्या सुमारास घरानजीक असलेल्या शौचालयाच्या बाहेर आल्यानंतर संशयित स्मिता घाडी, अमिता बाणे, दिव्या घाडी, अनिल बाणे, सुनीता बाणे यांनी त्यांना चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर तिचे हातपाय नायलॉन दोरीने घट्ट बांधून बाथरुमकडे ओढत नेले. त्यानंतर तिला बाथरुममध्ये कोंडून बाहेरून लॉक लावून बंदिस्त केले. या घटनेदरम्यान पीडित विवाहितेकडे मोबाईल होता. तिने पोलिसांच्या ११२ क्रमांकावर फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर देवगड पोलीस स्थानकाचे कॉन्स्टेबल नीलेश पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जात पीडित विवाहितेची सुटका केली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचे पीडित विवाहितेने देवगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून दाखल फिर्यादीनुसार स्मिता घाडी, अमिता बाणे, दिव्या गणेश घाडी, अनिल बाणे, सुनीता बाणे या संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास महिला पोलीस हवालदार अमृता बोराडे करीत आहेत.
