वेंगुर्ला (मंगल कामत) १८ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळाच्या कारवाईने आकाश फिशमिल ॲन्ड फिश ऑईल कंपनीचे उत्पादन बंद ; ग्रामस्थांनी मानले शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचे आभार
केळूस माळरानावर असलेल्या आकाश फिशमिल ॲन्ड फिश ऑईल कंपनीकडून होणाऱ्या जल व वायू प्रदुषणाविरोधात म्हापण खवणे, केळूस, कालवी ग्रामस्थांनी व केळूस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या तक्रारी अर्ज सादर केले होते. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळाकडे लेखी व फोनव्दारे तक्रारी करण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आकाश फिशमिल ॲन्ड फिश ऑईल कंपनीची पाहणी करुन उत्पादन घेण्यास बंदी केलेली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, दिनांक 27 जून 2024 रोजी मुसळधार पडणाऱ्या पावसाचा आधार घेत कंपनीने प्रक्रिया न केलेले दुषित सांडपाणी कंपनीलगत असलेल्या ओढ्यात सोडले. हे प्रक्रिया न केलेले दुषित सांडपाणी कंपनीच्या आजबाजूला असलेल्या विहीरींना जावून पिण्याचे पाणी दुषित झाले त्याचप्रमाणे ओढ्याव्दारे प्रक्रिया न केलेले दुषित सांडपाणी सोडल्यामुळे या भागात दुर्गंधी निर्माण झाली. हेच प्रक्रिया न केलेले दुषित सांडपाणी खवणे खाडीपात्रात जावून त्या खाडीतील मासे व इतर जीवजंतु मरण पावले. पाण्याची तीव्रता एवढी होती की, खाडीपात्रातील कांदळवनाचे ही नुकसान झाले. याबाबतची माहीती ग्रामस्थांना मिळल्यानंतर त्यांनी लागलीच आकाश फिशमिल ॲन्ड फिश ऑईल कंपनीकडे धाव घेतली आणि वस्तुस्थितीची जाणीव करुन देवून आपला रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला परतुं कंपनी व्यवस्थापन व त्यांच्या हितचिंतकानी यावर सारवासारव करुन पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. कंपनीकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष करुन पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या जिवीताशी अक्ष्यम्य खेळ केल्यामुळे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्रामस्थांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे व जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे याबाबत लेखी व फोनव्दारे तक्रारी नोंदविल्या. त्याचप्रमाणे दिनांक 16 जुलै 2024 रोजी मा. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, मा. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 18 जुलै 2024 रोजी ग्रामस्थांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आकाश फिशमिल ॲन्ड फिश ऑईल कंपनीची व लगतच्या संपुर्ण परीसराची पाहणी केली त्यावेळी कंपनीच्या पाठीमागील भागात चुकीच्या पद्धतीने साठवलेला प्रक्रियेअंती येणारा स्लज, ओढ्याव्दारे सोडलेले पाणी, या परिसरात असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या विहीरी, खवणे खाडीपात्रात गेलेले पाणी, कंपनीने पाठीमागील भागात साठवून ठेवलेला कचरा, कंपनीच्या समोरच्या डोंगरभागात चुकीच्या पद्धतीने टाकलेली दगडी कोळशाची राख आणि त्यात पाईपाव्दारे सोडलेले सांडपाणी, त्यामुळे मरण पावलेली झाडे, कंपनीतून निघणारे दुषित सांडपाणी सोडण्यासाठी या कातळ भागात मारलेले मोठमोठाले खड्डे, त्यात सोडलेले दुषित सांडपाणी व त्यापासून निर्माण होणारी दुर्गंधी, या साठलेल्या पाण्यामुळे होणारी डास निर्मिती आदीबाबत पाहणी करुन आपला अहवाल आपल्या वरिष्ठांना सादर केला त्यानुसार दिनांक 22 जुलै 2024 रोजी कंपनीस कच्च्या तलावात अशास्त्रीय पद्धतीने गाळ साठवून ठेवलेबद्दल, प्रक्रिया न केलेले दुषित सांडपाणी इतरत्र टाकून महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळाने घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन न केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावून 7 दिवसांच्या मुदतीत याबाबत खुलासा व योग्य ती कार्यवाही न केल्यास संमत्ती नाकारण्याबाबत सुचना केली होती. तसेच विद्युत कनेक्शन व पाणी कनेक्शन तोडण्यासाठी संदर्भात कळविले होते. परतुं दिनांक 30 जुलै 2024 पर्यत कोणतीही कारवाई न झाल्याने 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निवेदनातून इशारा दिला.
त्यानुसार प्रशासनाकडून उपोषणापासून ग्रामस्थांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला गेला. दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी पालकमंत्री महोदयांनी सावंतवाडी-वेंगुर्ला-दोडामार्ग विधानसभा मतदार संघाच्या आयोजित केलेल्या जनता दरबारात सुद्धा न्याय मिळविण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले. परतुं संबधित विभागाचे अधिकारी याठिकाणी उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थं आपल्या उपोषणावर ठाम राहिले. परतुं मा. अप्पर जिल्हाधिकारी श्री. मच्छींद्र सुकटे यांच्या दालनात झालेल्या चर्चेनुसार महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळाच्या दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी बजावलेल्या विज व पाणी बंद करणेच्या नोटीसीची अंमलबजावणी करणे व दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी मा. शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीबाबत माहीती देवून यशस्वी शिष्टाई केल्याने ग्रामस्थांनी आपले बेमुदत उपोषण स्थगित केले. मा. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कंपनी संबधित सर्व विभागाचे अधिकारी, कंपनीचे संचालक/व्यवस्थापक व केळूस, कालवी, म्हापण, खवणे, ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या. या बैठकीत कंपनीने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला परतुं महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यापुर्वी केलेल्या पाहणी अहवालाची वस्तुस्थिती सर्वासमोर मांडल्याने जल व वायु प्रदुषणावर ठोस उपाययोजना करेपर्यत कंपनीस उत्पादन घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच या बैठकीत ठरल्याप्रमाणे कंपनी व संपुर्ण परिसराची पाहणी महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळाच्या बैठकीस उपस्थित वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत ग्रामस्थांसह करणेचे निर्देश मा. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिले. वस्तुस्थितीची माहीती घेऊन मानवी जिवनावर होणारे दुष्परीणामांचा विचार करुन ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासावर आळा घालण्याच्या दृष्टीने व येथिल पर्यटन व्यवसायास चालना देण्यासाठी मा. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे केळूस, कालवी, म्हापण, खवणे, ग्रामस्थांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे आभार मानले.
