कणकवली( प्रतिनिधी) भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे हे निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याची हरकत आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी घेतली होती. मात्र सुनावणी अंती ही हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली आहे.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत सादर झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया आज सुरू करण्यात आली. यात सर्व प्रथम नगराध्यक्ष पदाच्या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. यात शहर आघाडी तथा क्रांतिकारी विचार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला.
नलावडे यांना एका गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली असल्यामुळे ते निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याचे पारकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या निदर्शनास आणले. मात्र नलावडे यांच्यातर्फे अँड. राजेंद्र रावराणे यांनी यशस्वी युक्तिवाद केल्याने पारकर यांचा आक्षेप फेटाळला गेला आहे.
समीर नलावडे यांना एका गुन्ह्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याचे पारकर यांचे म्हणणे होते. मात्र नलावडे यांच्यातर्फे युक्तिवाद करताना अँड. राजेंद्र रावराणे यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालय निकालपत्र निवडणक निर्णय अधिकारी श्री देशपांडे यांच्याकडे
सादर केले.
नलावडे यांनी जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील केले आहे. तर उच्च न्यायालयाने नलावडे यांच्या शिक्षेला सध्या स्थगिती दिली आहे. शिक्षेला स्थगिती दिली असल्यास निवडणूक लढवता येते, असे आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे अँड रावराणे म्हणाले. त्यानुसार पारकर यांची हरकत फेटाळली गेली आहे, असेही रावराणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
