सुमारे 300 वर्षांनी अनुभवली मिठबाव श्री देव रामेश्वराच्या दरबारात त्रिपुरारी पौर्णिमा यात्रोत्सवाची अविस्मरणीय रात्र

0 minutes, 0 seconds Read

 

5000 पणत्यांनी उजळला श्री देव रामेश्वराचा मंदिर परिसर

देवगड  (प्रतिनिधी)

सुमारे तीनशे वर्षांनंतर मिठबाव गावात खंडित असलेल्या श्री देव रामेश्वराचा वार्षिकोत्सव पुनर्प्रारंभ झाला आणि त्यासोबतच त्रिपुरारी पौर्णिमेच्या जागरण सोहळ्याचा दिव्य थाट पुन्हा अनुभवायला मिठबाव,तांबळडेग, कातवण या तिन्ही गावच्या गाव घर रयतेला मिळाला.यावेळी आयोजित दीपोत्सवात सुमारे 5 हजार दीपप्रज्वलित केल्याने या सोहळ्याने गावातील प्रत्येकाच्या मनात अभिमान आणि आनंदाची लहर निर्माण केली.

 

त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंकराचा उत्सव मानला जातो. पुराणकथेनुसार, या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नामक राक्षसाचा संहार करून धर्म, सत्य आणि सदाचार यांचा विजय प्रस्थापित केला. या घटनेनंतर शंकराला ‘त्रिपुरारी’ हे नाव प्राप्त झाले.
ही पौर्णिमा म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय, अहंकारावर भक्तीचा विजय आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय म्हणूनच या दिवशी दिवे लावून, मंदिरात दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. यालाच स्थानिक भाषेत “टिपर पाजळणे” असे म्हटले जाते.
सुमारे तीन शतकानंतर होणारा हा त्रिपुरारी पौर्णिमा यात्रोत्सव अर्थात टिपर उत्सव संपूर्ण मिठबाव गावासाठी अविस्मरणीय ठरला.
सकाळी पारंपारिक धार्मिक विधी पार पडले, तर दुपारी तीन वाजता भव्य देवतरंग सोहळा रंगला. रवळनाथ मंदिरातून निघालेली देवस्वारी मिरवणुकीसह श्री देव रामेश्वर मंदिरात पोहोचली. सायंकाळी सात वाजता मंदिर परिसरात सुमारे 5000 पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. त्या तेजोमय दीपांनी संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला. स्थानिक कलाकारांच्या भजनाच्या सुरांनी भक्तीभावाने भारलेले वातावरण निर्माण झाले.
रात्री बारा वाजता श्री देव रामेश्वराची पालखी प्रदक्षिणा मंदिरासभोवताली काढण्यात आली.त्यानंतर मंदिरपरिसरातील बारा दीपमाळेवर बारा पाच मानकरी यांनी दीप प्रज्वलित केले.ज्यामुळे परिसर दिव्य तेजाने झळाळून गेला.
यानंतर रात्री एक वाजता महापुरुष दिंडी भजन मंडळ कातवण वरची वाडी यांनी वारकरी दिंडी भजनाचे मंडळाने अप्रतिम सादरीकरण करून वातावरण भक्तिरसाने ओथंबून टाकले.
या यात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री देव रामेश्वर, रवळनाथ आणि गजाबादेवी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.
त्याचबरोबर यात्रेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना देखील फायदा झाला. मंदिर परिसरात थाटलेल्या दुकानांमुळे आणि वस्तूंच्या विक्रीमुळे व्यापारी वर्गाची आर्थिक उलाढाल लक्षणीय होताना पहायला मिळाले.
सामान्यतः पौर्णिमेच्या दिवशी अनेक भाविक बाहेर गावी असलेल्या यात्रांना जात असतात. पण यंदा सुमारे 300 वर्षांनी आपल्या गावातच त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा होत असल्याने, गावातील भाविक बाहेर जाण्याऐवजी याच सोहळ्यात सहभागी झाले.तसेच मिठबाव, तांबळडेग, कातवण, कुणकेश्वर, हिंदळे, मोर्वे,दहीबाव,बागमळा आदी भागांतील भाविकांचीही यात्रा उत्सवात उपस्थिती दिसत होती.
यात्राउत्सवला दीपोत्सवाची जोड देत त्रिपुरारी पौर्णिमेचा हा ऐतिहासिक उत्सव मिठबाव श्री देव रामेश्वर देवस्थान समितीच्या सर्व सदस्यांच्या अथक परिश्रमांमुळे पहिल्याच वर्षी अगदी दिमाखात साजरा करण्यात आला.या सोहळ्याच्या यशासाठी कार्य करणाऱ्या बारापाच मानकरी, देवसेवक, गावघररयत या सर्व मंडळींच्या समन्वयाने आणि भाविक भक्तांच्या सहकार्यानेच हा उत्सव शक्य झाला.मिठबाव रामेश्वर देवस्थान समितीच्या वतीने या त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे तसेच भजन मंडळ, यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *