नगरपंचायत प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी पैशांची उधळण ; चक्क ९७ लाख रूपये टाकले खर्ची
देवगड : चक्क सर्वसाधारण सभेतच देवगड जामसंडे नगरपंचायत म्हणजे पैसे छापण्याचा कारखाना असा गंभीर आरोप सत्ताधारी भाजपचे नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी करून सत्ताधारकांना घरचा आहेर दिला.पुलाच्या निकृष्ट बांधकामावरून प्रशासनाला धारेवर धरत कावले यांनी हा गंभीर आरोप केल्याने नगरपंचायतीची सभा ही चांगलीच गाजली.प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी शासनाने ९७ लाख रूपये खर्च घातले हाही मोठा घोटाळा आहे असा आरोप करून नगरपंचायत सभेत कावले यांनी प्रशासनाची अक्षरश: झोप उडविली.
याबाबतत घेतलेल्या सभेचा ठरावासहित सविस्तर माहिती सभागृहाला द्यावी अशी मागणी कावले यांनी करताच हा ठराव मागील सत्ताधाऱ्यांच्या काळात करण्यात आला होता व त्याच सत्ताधाऱ्यांच्या दोन नगराध्यक्षांच्या काळातच संबंधित एजन्सीला देयके अदा करण्यात आली ही माहितीही प्रशासनाने दिलेल्या माहितीतून उघड झाली.
देवगड जामसंडे नगरपंचायतीची मासिक सर्वसाधारण सभा मंगळवारी न.पं.सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेला मुख्याधिकारी गौरी पाटील, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे, बांधकाम सभापती शरद ठुकरूल, स्वच्छता सभापती सौ.आद्या गुमास्ते, पाणीपुरवठा सभापती सौ.प्रणाली माने उपस्थित होत्या.
भाजपाचे नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी प्रारून विकास आराखडा तयार करण्यासाठी शासनाने ९७ लाख रूपये खर्च केले याची सविस्तर माहिती सभागृहाला द्यावी अशी मागणी करीत केवळ प्रारूप विकास आराखड्याचा सर्वेसाठी ९७ लाख खर्ची टाकणे हाच मोठा घोटाळा आहे असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
सर्वे करण्यासाठी एजन्सी नेमण्यात आली त्याबाबत नगरपंचायतीचा सभेचा ठराव, कोणाच्या सहीने देयके अदा केली? सर्वे करताना पंचयादी केली होती का ? याबाबतची सविस्तर माहिती सभागृहाला द्यावी अशी मागणी कावले यांनी केली. मात्र केवळ या आराखडा तयार करण्यासाठी ९७ लाख खर्च करणे हाच मोठा घोटाळा आहे असा आरोप कावले यांनी केला.याबाबतची सविस्तर माहिती सभेतच द्यावी असे निर्देश नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी प्रशासनाला दिल्या.
यावेळी प्रशासनाच्यावतीने लेखापाल सुजित भुसारे यांनी दिनांक ७ मार्च २०१८ रोजी झालेल्या नगरपंचायत मासीक सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ७३ नुसार इएल्यु नकाशा व आधारभूत नकाशा तयार करणे व त्यासाठी तांत्रिक सल्लागार नेमणे असा ठराव घेण्यात आला होता. या ठरावाला तत्कालीन नगरसेवक उमेश कणेरकर हे सुचक होते तर बापु जुवाटकर हे अनुमोदक होते.त्यावेळी योगेश चांदोस्कर हे नगराध्यक्ष होते अशी माहिती यावेळी देण्यात आली.
१४ व्या वित्त आयोगातून यासाठी ९९ लाख २६ हजार ५५ रूपये निधी मंजुर करण्यात आला होता याला २९ डिसेंबर २०१८ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली.पहिले देयक रूपये ३ लाख ९० हजार १३६ दिनांक ८ एप्रिल २०१९ रोजी, दुसरे देयक ४ जुन २०१९ रोजी ३१ लाख २१ हजार ८८, तिसरे देयक रूपये २७ लाख ३० हजार ९५२ रूपये तर चौथे आणि अंतीम देयक रूपये ९ लाख ७५ हजार ३८६ हे दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी रूपये यासाठी शासनाने नेमलेली एपेक्स कन्सल्टन नाशिक या कंपनीला अदा करण्यात आली.चार टप्प्यात देण्यात आलेल्या देयकांवेळी योगेश चांदोस्कर, सौ.प्रणाली माने व साक्षी प्रभू हे नगराध्यक्ष तर परितोष कंकाळ, संतोष जिरगे हे मुख्याधिकारी होते अशी माहिती भुसारे यांनी यावेळी दिली.
जामसंडे तलाठी कार्यालयासमोर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे याबाबत तक्रार देवूनही कार्यवाही झाली नाही याकडेही कावले यांनी लक्ष वेधले.यावेळी कावले यांचे तक्रारीचे पत्रच मिळाले नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली यावर कावले यांनी संताप व्यक्त करून आपण दिलेला तक्रार अर्जही प्रशासनाकडे नाही आपल्याकडे त्याची पोच आहे असे सांगून देवगड जामसंडे नगरपंचायत म्हणजे पैसे छापण्याचा कारखाना आहे असा गंभीर आरोप यावेळी केला यावर नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनीही चुकीचे आरोप करू नका असे सुनावले मात्र कावले यांनी आपण चुकीचे आरोप करीत नाही.हा जनतेचा आवाज आहे.जनतेचे मत आपण मांडत आहोत असे सांगीतले.
डीपीआर प्लॅनमधून कचरा संकलनासाठी घेतलेले डस्टबीन आणि पुशकार्ड याचा वापर नागरिकांसाठी काय केलात व ते कोठे आहेत याची माहिती द्यावी अशी सुचना सौ.प्रणाली माने यांनी केली.
नगरपंचायत प्रारूप विकास आराखड्याबाबत हरकती घेण्याची मुदत संपली तरीही हरकती घेतल्या जात आहेत याबाबतची माहिती नगरसेवकांनाही द्यावी अशी सुचना नगरसेवक विशाल मांजरेकर यांनी केली.तर भुमिगत विद्युतवाहीनीचे काम सध्या सुरू आहे मात्र ते कोणत्या भागातून करण्यात येत आहेत याचीही माहिती आगावू देण्यात यावी अशी सुचना संतोष तारी यांनी केली.खुशी एंटरप्रायजेस या संस्थेने सफाई कर्मचारी यांच्या किमान वेतनाप्रमाणे न दिलेल्या फरकाचा विषय सभेत गाजला.यावेळी संबंधित संस्थेला नोटीस द्या असे निर्देश नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी प्रशासनाला दिले.
