सावंतवाडी – मळेवाड सातार्डा मार्गावरील कोंडुरे जांभळीचे भरड येथे एका अज्ञात व्यक्तीने मृतावस्थेतील तीन मोठे डुक्कर व तीन डुकरांची पिल्ले रस्त्यालगत टाकल्याने या परिसरात एकच दुर्गंधी पसरली.ग्रामपंचायत सदस्य अमोल या घटनेची माहिती मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांना दिल्यानंतर मराठे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी व पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. यानंतर मराठे यांनी आपला जे सी बी आणून सदर डुक्कर पुरून विल्हेवाट लावली.अशा घटना गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याने असा प्रकार पुन्हा घडू नये.
या करिता जिल्हाधिकारी,पोलिस निरीक्षक, प्रांताधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन ग्रामपंचायतकडून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांतून केली आहे. तसेच असा प्रकार परत घडल्यास डुक्कर वाहतूक करणाऱ्या गाड्या रोखण्यात येतील असा इशाराही ग्रामस्थानी दिला आहे.
