देवगड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तालुक्यात धामधूम सुरू असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. भाजप आणि शिंदे गट शिवसेना यांच्या युतीमुळे कोकणात मैत्रीपूर्ण लढती दिसतील, अशी परिस्थिती आहे. दरम्यान, आरक्षण सोडती नंतर अनेक इच्छुकांची समीकरणे बदलली असून, काही मतदारसंघांत उमेदवारांच्या ‘आयात-निर्यात’ चे राजकारणही पाहायला मिळत आहे.
देवगड तालुक्यातील ७ जिल्हा परिषद व १४ पंचायत समिती गणांपैकी शिरगाव हा एकमेव जिल्हा परिषद गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित पडला आहे. यामुळे या गणातून माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांनी जिल्हा परिषद उमेदवारीवर दावा ठोकला आहे. “मी या मतदारसंघातील स्थानिक आणि अनुसूचित जाती आरक्षणास पात्र उमेदवार असल्याने, जिल्हा परिषदेतून अधिक मोठ्या पातळीवर विकासकामे करण्याची इच्छा आहे,” असे ते स्पष्टपणे सांगतात. मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींवर अवलंबून असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तळवडे पंचायत समिती गणातून मागील निवडणुकीत तब्बल १५० मतांनी विजय मिळवला होता. पाच वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे २२ कोटी रुपयांची विकासकामे मतदारसंघात पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण केली आहेत. त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, पाणी व्यवस्था, रस्ते, स्ट्रीट लाईट, त्याचबरोबर वैयक्तिक लाभामध्ये ग्रास कटर, घरघंटी, सायकल, मोफत हळद वाटप, घरकुल इत्यादी चौफेर विकासाची प्रक्रिया राबविणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची खासियत आहे. एखादा विषय त्यांच्या कानावर पडला की तो मार्गी लागेपर्यंत, पाठपुरावा करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
मागील निवडणुकीमध्ये त्यांच्यावर खासदार नारायण राणे साहेब आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी जो विश्वास दाखवून पंचायत समितीची उमेदवारी दिली. त्या पदावर राहून त्यांच्या विश्वासाला साजेसे काम अजित कांबळे यांनी पाच वर्षाच्या कालावधीमध्ये केले आहे.
खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि माजी आमदार अजित गोगटे यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी योग्य नियमांवर चर्चा करून, चुका दुरुस्त करण्यास भाग पाडणारा ‘कणखर लोकप्रतिनिधी’ अशी त्यांची ओळख आहे.
उपोषण, आंदोलन आणि विकासकामांची कास
देवगड पाणीपुरवठा कार्यालय स्थलांतराच्या निर्णयाला मूर्त रूप मिळावे म्हणून त्यांनी उपोषण करून प्रशासनाला धडकी भरवली होती. अखेर त्यांच्या भूमिकेस प्रशासनाने मान देत कार्यालय स्थलांतरित करावे लागले.
तळवडे धबधब्याजवळ पार्किंग व सुविधा शेडच्या कामातील निकृष्ट दर्जा उघड करत, ठेकेदारांची बेफिकिरीही त्यांनी समोर आणली होती. चुकीचे काम कोणाचेही असो अधिकारी की लोकप्रतिनिधी ते नियमाने दुरुस्त करायलाच हवे, ही त्यांची भुमिका कायम राहिली आहे.
स्थानिक उमेदवारांना मतदारांचा पाठिंबा?
तालुक्यात उमेदवारांची ‘आयात-निर्यात’ होण्याची शक्यता जरी जास्त असली, तरी स्थानिक उमेदवारांनाच मतदार बांधव मोठे समर्थन देतील, असे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. शिरगाव व तळवडे या दोन्ही मतदारसंघांमध्ये चांगली पकड, प्रशासकीय जाण आणि मतदारांशी घट्ट नाते या गुणांमुळे अजित कांबळे हे भाजपचे प्रभावी दावेदार ठरत आहेत.
म्हणूनच “शिरगाव जिल्हा परिषदेसाठी भाजप उमेदवार म्हणून अजित कांबळे यांना संधी द्यावी,” अशी मागणी राजकीय वर्तुळात जोरदारपणे पुढे येऊ लागली आहे.
