कोकणात प्रथमच सापडले लज्जागौरीचे कातळचित्र

देवगड (प्रतिनिधी)

 

देवगड तालुक्यातील वळीवंडे गावाच्या जांभ्या कातळ सड्यावर लज्यागौरीचे कातळचित्र आढळल्याचे वृत्त कोकण इतिहास परीषद व देवगड इतिहास संशोधन मंडळाच्या माध्यमातुन पुढे आले आहे. गेली अनेक वर्षे या दोन्ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात कातळचित्र संशोधन व संवर्धनाचे काम करीत आहेत.

आजवर लज्जागौरी सदृश्य पेट्रोग्लिफ सापडल्याच्या बातम्या फोटोंसह झळकल्या होत्या. पण ही चित्रे भौमितिक व थोडी वेगळ्या शैलीने कोरलेली असल्याने ती लज्यागौरीची आहेत का? असे प्रश्न संशोधकांसमोर होते. पण आता देवगड तालुक्यात सापडलेल्या लज्जागौरीच्या हुबेहुब कातळ खोद चित्रामुळे हा संभ्रम दूर झाला आहे.

या विषयी अधिक माहीती देताना प्राच्यविद्या अभ्यासक श्री. रणजित हिर्लेकर म्हणाले, “की प्रागैतिहासिक काळापासुनच मानवाला स्त्रीच्या सृजन शक्ती विषयी कुतुहल होते. ज्या काळात मानवाला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी भिषण संघर्षाला तोंड द्यावे लागत होते; त्या काळात ही सृजन शक्तीच त्याचे अस्तीत्व टिकविण्यासाठी महत्वाची होती. त्यामुळे या सृजन शक्तीपुढे तो नम्र झालेला दिसतो. त्यातुन लज्यागौरी सारख्या स्त्री प्रतीमां मधुन शक्ती उपासनेचा उदय झालेला दिसतो.

दाभोळला सापडलेले स्त्रीचे कमरे पर्यंतचे जे कातळचित्र आहे, त्यात मातृ देवतेचे सुरवातीचे रुप आपणास पहाता येते. अनेक ठिकाणी दिसणारे गुढग्या पर्यंतचे पाय, इतकेच काय तर पुर्ण मानवाकृती यांमधे देखील काही स्त्री प्रतीमा आढळल्या आहेत. कुडाळ येथील खोटले गावाच्या सड्यावर सापडलेले कातळचित्र हे देखील थोडेसे अस्पष्ट शैलीतील आहे. लज्यागौरीच्या मुर्तीच्या मुखाकडे असणारे कमळाचे चित्रण या कातळचित्रात वेगळ्या प्रकारच्या फुलाचे कोरलोलो दिसुन येते.

पण वळीवंडे येथील शिरविरहीत असणारे द्विभुज व उत्तानपाद स्थितीतील हे कातळचित्र लज्जागौरीची हुबेहुब प्रतिमा आहे.बदामी चालुक्यांच्या काळातील लज्जागौरीची जी दुर्मिळ शिल्पे आपणास पहावयास मिळतात त्याच्याशी तंतोतंत जुळणारी ही कातळात कोरलेली रेखाकृती अतिशय वैशिष्ठ्यपुर्ण आहे.”

हे कातळचित्र काही वर्षापुर्वीच आढळले होते. या विषयी निट काम करावे लागेल हे लक्षात घेऊन गेली काही वर्षे इतिहास संशोधन मंडळाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेउन सातत्याने अभ्यास प्रक्रिया सुरु होती. या साईट विषयी अधिक माहीती देताना हिर्लेकर म्हणाले, “येथे चाळीसहून अधीक वैशिष्ठयपूर्ण कातळचित्रे सापडली आहेत.

येथे आणखीन तीन कातऴचित्रे ही लज्जागौरी प्रकारातील आहेत. पण यांची रचना ही भौमितीक प्रकारातील आहे. हुबेहुब लज्जागौरीच्या स्त्री प्रतिमे प्रमाणे केलेल्या या कोरीव चित्रामुळे कोकणात ठिकठिकाणी आढळणारी मातृशक्तीची वेगवेगळ्या शैलीतील कातळचित्रे ही लज्जागौरीचीच असल्याचे स्पष्ट होते. आदीमकाळा पासून माणुस या स्त्रीच्या सृजनशक्तीपुढे नम्र झाल्याचे दिसून येते व त्यातूनच पुढे ही संकल्पना विकसित होत शक्ती या देवतेचा संप्रदाय विकसित झाला असल्याचे दिसते.

ही साईट नंदूकाका साळस्कर यांच्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोचली. श्री. अजित टाककर, योगेश धुपकर, लक्ष्मण पाताडे, किरण पांचाऴ, महेन्द्र देवगडकर आदींचे सहकार्य या कातळचित्रांच्या शोधकार्यात नेहमी प्रमाणेच लाभले आहे. गेल्या चार वर्षात अनेकदा या साईटला भेट देण्यात आली आणि प्रत्येक वेळी ही मंडळी उत्साहाने या संशोधन कार्यात सहभागी होती. देवगड तालुक्यात नव्याने सापडलेल्या या कातळचित्रामुळे कातळचित्रांच्या ऩकाशावर देवगडचे स्थान महत्वपुर्ण ठरणार आहे.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *